एक कोटीची झाली ग्रंथविक्री

By admin | Published: February 27, 2017 03:34 AM2017-02-27T03:34:23+5:302017-02-27T03:34:23+5:30

शहरात झालेल्या ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात केवळ एक कोटी रुपयांची ग्रंथविक्री झाली आहे.

Book auction for 1 crore | एक कोटीची झाली ग्रंथविक्री

एक कोटीची झाली ग्रंथविक्री

Next

जान्हवी मोर्ये,
डोंबिवली- शहरात झालेल्या ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात केवळ एक कोटी रुपयांची ग्रंथविक्री झाली आहे. मागील संमेलनाच्या तुलनेत ही विक्री २० टक्केच आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनाकरता आर्थिक मदतीसाठी मराठी साहित्य महामंडळाने केलेल्या आवाहनाला मराठी साहित्य प्रकाशक व विक्रेत्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. हे स्पष्ट झाले आहे.
डोंबिवली सांस्कृतिक नगरी असल्याने येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात विक्रमी ग्रंथविक्री होईल, अशी अपेक्षा होती. संमेलनाच्या पु. भा. भावे साहित्य नगरीत उभारलेल्या रा. चि. ढेरे ग्रंथग्राममध्ये ३५६ ग्रंथ प्रकाशक व विक्रेते सहभागी झाले होते. ग्रंथविक्री चांगली व्हावी, यासाठी ग्रंथ दालनाचे उद्घाटन संमेलनाच्या पहिल्याच दिवशी ३ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजताच करण्यात आले. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी ग्रंथविक्रेते, प्रकाशक यांनी काही अंशी आर्थिक मदत करावी, असे आवाहन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले होते.
परंतु, एकाही प्रकाशक व विक्रेत्यांनी मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी सतपात्री दान देण्याचे सौजन्य दाखवलेले नाही. याबाबत डॉ. जोशी यांना विचारले असता, ते म्हणाले की, ‘आपण आवाहन करीत राहणे हेच आमच्या हाती आहे. त्याला प्रतिसाद किती व कसा मिळेल, हे आपण सांगू शकत नाही.’
मराठी प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी सांगितले की, ग्रंथदालनात एक कोटी रुपये ग्रंथविक्री झाली. त्यात प्रकाशक कमी आणि विक्रेते जास्त होते. पिंपरी-चिंचवडला पाच कोटी रुपये ग्रंथ विक्री झाली होती. त्या तुलनेत डोंबिवलीतील साहित्य संमेलनात केवळ २० टक्केच ग्रंथ विक्री झाली. संमेलन लोकांपर्यंत पोहोचविण्यात आयोजक अपयशी ठरले. त्यामुळे ग्रंथविक्री झाली नाही. ग्रंथविक्रीच कमी झाल्याने मदत कशी करणार, असा सवाल आमच्या पुढे आहे. पिंपरी-चिंचवडला ग्रामीण भागातील वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. याउलट डोंबिवलीतील शहरी वाचकांपैकी केवळ तरुण वाचकच पुस्तक खरेदीकडे वळला, हे या संमेलनात समाधानकारक चित्र होते.
दरम्यान, कमी निधी जमा झाल्याने खर्चात काटकसर करण्यात आली. साहित्यिकांना मानधन परत करण्याचे आवाहन केले होते.
साहित्य संमेलनात कवी, सूत्रसंचालक, साहित्यिक, मुलाखतकार, मुलाखत देणारे मान्यवर, असे जवळपास २११ जण सहभागी झाले होते. समन्वय, सूत्रसंचालक व अध्यक्षांना अडीच हजार मानधन व तीन वेळाचा प्रवास खर्च देण्यात आला. तर वक्ता, कवी मंडळींना दोन हजार मानधन व तीन वेळाचा प्रवास खर्च दिला गेला. २११ जणांपैकी केवळ किरण येले यांनीच मानधन परत केले आहे. ज्याचा लेखन हाच प्रपंच आहे, त्यावरच त्याचा उदरनिर्वाह आहे. त्यांच्याकडून मानधन परतीची
अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरले. मात्र ज्यांचा लेखन प्रपंच ही त्यांची ओळख आहे, त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधनही अन्य आहे.
>कविता, साहित्यवाचन
साहित्य संमेलनानंतर आगरी यूथ फोरमतर्फे २७ फेबु्रवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने कविवर्य कुसुमाग्रजांच्या कविता आणि साहित्यावर आधारित एक तासाचा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यालय, जगन्नाथ कॉमर्स प्लाझा, पहिला मजला, मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व) येथे सायंकाळी ६.३० वाजता होईल.
खर्चाची तारीख लांबली
साहित्य संमेलनाचा खर्च दीड महिन्याच्या आत महामंडळास सादर करावा लागतो. संमेलनाचा खर्च ५ मार्चपर्यंत महामंडळास सादर करण्याचे ठरले होते.
मात्र महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे संमेलनाचा खर्च सादर करण्याची तारीख लांबली. आता १९ मार्चला तो सादर केला जाणार आहे, असे आयोजक आगरी यूथ फोरमकडून सांगण्यात आले.

Web Title: Book auction for 1 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.