पुण्यात पुस्तकवाचनाची वारी : कोथरुड भागात आगळा-वेगळा बुक कॅफे
By Admin | Published: November 3, 2016 08:45 AM2016-11-03T08:45:08+5:302016-11-03T08:50:12+5:30
रुणाईला भावणारे वातावरण निर्माण करून त्यांना वाचनासाठी प्रवृत्त करण्यासाठी पुण्यातील कोथरुड परिसरात बुक कॅफे सुरू झाला आहे.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३ - तरुणांनी वाचनसंस्कृती जोपसावी अशी अपेक्षा केली जाते, मात्र तरुणाईला भावेल असे वातावरण ग्रंथालयांमध्ये अपवादानेच लाभते. त्यामुळे ही तरुणाई सीसीडी, बरिस्ता, स्टारबक्समध्ये आनंद शोधायला जाते. याला छेद देऊन तरुणाईला भावणारे वातावरण निर्माण करून त्यांना वाचनासाठी प्रवृत्त करण्यासाठी पुण्यातील कोथरुड परिसरात बुक कॅफे सुरू झाला आहे.
तरुणांच्या मनाचा वेध घेऊन, तरुणांना त्यांच्या आवडीने, बळजबरी न करता कश्या प्रकारे वाचनाकडे वळवता येईल याचा विचार पुण्याच्या सती भावे यांनी केला. त्यांच्या कल्पनेतून साकार झाला 'वारी बुक कॅफे अॅण्ड क्रिअेटिव्ह स्पेस'. धावपळीच्या, धकाधकीच्या आयुष्यातून लोकांना काही काळासाठी निवांतपणा मिळावा,शांतता मिळावी यासाठी एखादी त्यांच्या हक्काची जागा असावी असे वाटले. यातूनच बुक कॅफे सुरु करण्याची कल्पना त्यांना सुचली. पुण्याच्या कोथरुड भागात हा बुक कॅफे सुरु करण्यात आला आहे. येथे साहित्य,वैचारिक, ललित, कथा, कांदब-या, मनोविज्ञान, तत्त्वज्ञान अश्या विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. कॉफीचा आस्वाद घेत तासन-तास पुस्तके येथे वाचता येतात. लहान मुलांच्या गोष्टी-कथांची पुस्तकेही येथे आहेत. येथे बसून वाचण्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येत नाही.सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत हा कॅफे सुरु असतो.
शांत वातावरण, मंद आवाजात लावण्यात येणारे शास्त्रीय संगीत, विविध फुलांच्या कुंड्या, विविध आकर्षक कंदिलांमध्ये लावण्यात आलेले दिवे, भारतीय बैठकीची सोय, आकर्षक चित्रांच्या लटकवलेल्या फ्रेम्स यांमुळे हा कॅफे तरुणांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे. अनेक तरुण आर्वजून या कॅफेला भेट देत आहेत. ताणतणावातून निवांत वाचन करण्यासाठी ते या जागेला पसंती देत आहेत. त्याचबरोबर शांतपणे बसून खेळता येण्यासारख्या खेळांचे साहित्यही ठेवण्यात आले आहे. या कॅफेविषयी सांगताना सती भावे म्हणाल्या, शहरातील लोकांना शहरी जीवनाच्या धावपळीतून बाजूला होऊन एखादं विसाव्याचं ठिकाण मिळावं की जिथे त्यांना आपल्या पुस्तकांबरोबर,छंदांबरोबर चिंतनासाठी वेळ घालवता यावा, शांत होता यावं यासाठी या बुक कॅफेची निर्मिती करण्यात आली आहे.
बुक कॅफे ही संकल्पना मी पहिल्यांदाच ऐकली आणि मला फारच आवडली. बुक कॅफे सारखा उपक्रम खबप चांगला आहे.मला इथे बसल्यावर शांतता मिळते. विविध विषयावरील पुस्तकं इथे असल्याने वाचनाची गोडीही निर्माण होण्यास मदत होत आहे.
- स्पृहा कुलकर्णी, तरुण वाचक