गडचिरोलीत जन्मले दुर्मीळ अक्रॉनियाग्रस्त बाळ; २० तासात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 06:09 PM2018-08-31T18:09:21+5:302018-08-31T18:15:51+5:30
येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरूवारी चिंचगुंडी या गावातील लक्ष्मी बोरेवार या महिलेने मेंदूवर कवटी नसलेल्या बाळास जन्म दिला. मात्र २० तासानंतर शुक्रवारी त्या बाळाचा मृत्यू झाला.
- प्रतिक मुधोळकर
अहेरी (गडचिरोली) : येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरूवारी चिंचगुंडी या गावातील लक्ष्मी बोरेवार या महिलेने मेंदूवर कवटी नसलेल्या बाळास जन्म दिला. मात्र २० तासानंतर शुक्रवारी त्या बाळाचा मृत्यू झाला. वैद्यकीय भाषेत अशा बाळाला अक्रॉनियाग्रस्त असे म्हणतात. अशा बाळाचा जन्म क्वचितच होत असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.
अक्रॉनियाग्रस्त बाळाच्या मेंदूवर कवटी नसते. तसेच कोणत्याही प्रकारच्या त्वचेचेसुद्धा आवरण नसते. मेंदू हवेच्या सरळ संपर्कात येत असतो. त्यामुळे बाळाचा मृत्यू अटळ असतो. हेल्पिंग हॅन्ड्स संस्थेचे सचिव शंकर मगडीवार यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात त्या महिलेला भरती केल्यानंतर अधीक्षक डॉ.कन्ना मडावी यांच्या मार्गदर्शनात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अनंत जाधव व महिला अधिपरीचारिकांनी सदर महिलेची प्रसूती केली. बाळास वाचविण्याचे प्रयत्न केले, मात्र २० तासानंतर त्या बाळाचा मृत्यू झाला.
याआधी २ महिन्यांपूर्वी अश्याच प्रकाराचे बाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात जन्मास आले होते, मात्र काही प्रमाणात त्याचा मेंदू झाकल्या गेला होता. अद्याप त्याची प्रकृती स्थिर आहे. गरोदर मातांनी असले प्रकार टाळण्यासाठी व सुदृढ बाळास जन्म देण्यासाठी काळजी घेणे अत्यावश्यक असून सकस व योग्य आहार, रक्तवाढीच्या गोळ्या आणि वेळोवेळी सोनोग्राफी करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय अधिक्षकांनी सांगितले.
अशा बाळाचा जन्म का होतो?
सहसा अनेक गरोदर महिला गरोदरपणाच्या काळात डॉक्टरांनी सांगितल्यानंतरही सोनोग्राफी करत नाही. त्यामुळे बाळाची वाढ कशी होत आहे हे कळत नाही. वैद्यकीय सूत्रानुसार, रक्ताची कमतरता आणि मातेने योग्य व सकस आहार न घेतल्यास बाळाची वाढ योग्य प्रकारे होत नाही. परिणामी असे बाळ जन्मास येऊन त्यांचा मृत्यू होतो. गरोदरपणात नियमित सोनोग्राफी केल्यास बाळाची वाढ दिसून येते. फॉलिक अॅसिडच्या गोळ्या आणि सकस, योग्य आहार घेतल्यास बाळाची वाढ योग्य प्रकारे होऊन सुदृढ बाळ जन्मास येऊ शकते.