केबल व्यावसायिकांचे भांडण, लोखंडी रॉडने मारहाण
By admin | Published: February 28, 2017 01:57 AM2017-02-28T01:57:47+5:302017-02-28T01:57:47+5:30
इंटरनेट जोडणीची केबल कापल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या केबल व्यावसायिकास नेताजी काशीद याच्यासह अन्य साथीदारांनी मारहाण केली.
पिंपरी : इंटरनेट जोडणीची केबल कापल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या केबल व्यावसायिकास नेताजी काशीद याच्यासह अन्य साथीदारांनी मारहाण केली. ही घटना मोरेवस्ती, चिखली येथे घडली. पाच जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत अनुप भोईटे जखमी झाले.
फिर्यादी भोईटे यांचा केबल व्यवसाय आहे, तर आरोपी काशीद यांचाही केबल व्यवसाय आहे. शुक्रवारी दुपारी भोईटे हे काशीद यांच्याकडे गेले. इंटरनेटची वायर तोडल्याबाबत त्यांनी काशीद यांना विचारणा केली. त्या वेळी काशीद याने भोईटे यांना कार्यालयात नेले. मंगेशला लोखंडी रॉड आणण्यास सांगितले. सुमंत याने भोईटे यांना खाली पाडले आणि काशीद याने भोईटे यांना रॉडने मारहाण केली. भोईटे यांचे सहकारी योगेश कांबळे व नीलेश भालेकर मध्यस्थी करण्यासाठी तेथे आले असता, सुमंत याने योगेश यांनाही लोखंडी रॉडने मारहाण केली, तर राजेंद्र वायसे याने नीलेश भालेकर याला शिवीगाळ करीत बघून घेण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी नेताजी दादाराव काशीद (वय ४६, रा. मोरेवस्ती, चिखली), सुमंत तांबे (वय ३२), मंगेश तांबे (वय १८), योगेश तांबे (वय २६), राजेंद्र धनराज वायसे (वय २२) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनुप पोपट भोईटे (वय २७, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)