'महाराजांच्या पुतळ्यावर छत्र बसवू शकत नाहीत, त्यांची राम मंदिर बांधायची लायकी नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 04:58 PM2018-11-23T16:58:32+5:302018-11-23T17:15:53+5:30
शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या येथील पुतळ्यावर छत्र लावण्याची घोषणा करण्यात आली होती.
मुंबई - काँग्रेस आमदार नितेश राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरराम मंदिरावरुन निशाणा साधला आहे. जे शिवरायांच्या पुतळ्यावर छत्र उभारू शकत नाहीत, त्यांची अयोध्येत राम मंदिर काय बांधायची लायकीच नाही ? असा सणसणीत टोला नितेश यांनी शिवसेनेला लगावला. स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांसमेवत नितेश राणेंनी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्री उभारुन आंदोलन केलं.
शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या येथील पुतळ्यावर छत्री लावण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, नितेश राणेंनी आपल्या समर्थकांसह महाराजांच्या पुतळ्यावर छत्री लावत शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. तसेच, जे महाराजांच्या पुतळ्याला छत्र देऊ शकत नाहीत, ते अयोध्येत मंदिर काय बांधणार ? असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरही टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरे नेहमीच भगव्याच्या नावाखाली राजकारण करत आले आहेत. आता, अयोध्येला जाऊनही केवळ राजकारण करत आहेत. मंदिर उभारण्याची त्यांची कुवत नाही, अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. दरम्यान, स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणेंच्या नेतृत्वात ढोल ताशांच्या गजरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्री अर्पण केली.
आम्ही दिलेले शब्द पाळतो !!
— nitesh rane (@NiteshNRane) November 23, 2018
पहिले आमचे छत्रपती..
मग जाऊन करा अयोध्या मध्ये आरती!! pic.twitter.com/FxqhSTDsLK