जहाज अपघातात विरारचे कॅप्टन बेपत्ता, फिलिपिन्स दुर्घटना, परराष्ट्रमंत्री स्वराज यांना कुटुंबीयांनी घातले साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 05:02 AM2017-10-17T05:02:50+5:302017-10-17T05:03:03+5:30
फिलिपिन्सपासून २८० किलोमीटर अंतरावर अपघातग्रस्त मालवाहू जहाजावरील २६ भारतीय बेपत्ता झाले होते. त्यातील १६ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
- शशी करपे
वसई : फिलिपिन्सपासून २८० किलोमीटर अंतरावर अपघातग्रस्त मालवाहू जहाजावरील २६ भारतीय बेपत्ता झाले होते. त्यातील १६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर बेपत्ता असलेल्यांमध्ये विरारमधील कॅप्टन राजेश नायर यांचा समावेश आहे. त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. नायर यांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना साकडे घातले आहे.
हाँगकाँगला नोंदणीकृत असलेले एमराल्ड स्टार हे मालवाहू जहाज हाँगकाँगहून इंडोनेशियाला खनिज पदार्थ घेऊन निघाले होते. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास फिलिपिन्सपासून २८० किलोमीटर अंतरावर जहाजाला अपघात झाला. या वेळी जहाजावर २६ भारतीय होते. त्यातील १६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. जपानचे तटरक्षक दल बचावकार्य करीत आहे.
या जहाजावर विरार येथील विराट नगर येथे राहणारे कॅप्टन राजेश नायर होते. अपघातानंतर नायर बेपत्ता आहेत. कॅप्टन नायर यांचे १९९६ साली कुलाबा येथील सेंट जोसेफ स्कूलमध्ये शालेय शिक्षण झाले. एल्फिन्स्टन कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी मर्चंट नेव्हीत प्रवेश घेतला. गेली १५ वर्षे ते मर्चंट नेव्हीत कार्यरत आहेत. १९९०पासून नायर आपली पत्नी रेश्मा, मुले वेदान्त (८) आणि इशिता (३) यांच्यासोबत विरारला राहावयास आले आहेत. रेश्मा पश्चिम रेल्वेत वाहतूक निरीक्षक म्हणून चर्चगेट येथे कार्यरत आहेत. राजेश नायर यांचे वडील रामचंद्रन नायर शिपिंग कॉर्पोरेशन आॅफ इंडियात इलेक्ट्रीकल आॅफिसर म्हणून कामाला होते. राजेश नायर अद्याप बेपत्ता असल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त आहेत. जपानच्या कोस्ट गार्डने १६ आॅक्टोबरपर्यंतच शोधमोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नायर कुटुंबीयांची चिंता आणखी वाढली आहे.
शोधमोहीम सुरूच राहणार
शोधमोहीम सुरू ठेवण्यात यावी, यासाठी नायर कुटुंबीयांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क साधला आहे. १६ आॅक्टोबरनंतरही शोधमोहीम सुरूच राहील, अशी ग्वाही स्वराज यांनी नायर कुटुंबीयांना दिली आहे. गेल्या आठवड्यात ३ आॅक्टोबरला नायर यांनी व्हॉट्स अॅप कॉलद्वारे काही मित्रांशी संपर्क साधला होता. या वेळी आपण डिसेंबरला विरारला येणार असल्याचेही त्यांनी मित्रांना सांगितले होते.