संतांनीही जातीव्यवस्था नाकारली : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 05:29 PM2018-10-08T17:29:32+5:302018-10-09T18:53:07+5:30
क्षुद्रांना बंद असलेले ज्ञानाचे दरवाजे खुले करण्यासाठी शाहू, आंबेडकर, फुले यांनी पुढाकार घेतला. त्यापूर्वीच्या कालखंडात संतसाहित्यातून ही भूमिका मांडण्यात आली होती.
पुणे : क्षुद्रांना बंद असलेले ज्ञानाचे दरवाजे खुले करण्यासाठी शाहू, आंबेडकर, फुले यांनी पुढाकार घेतला. त्यापूर्वीच्या कालखंडात संतसाहित्यातून ही भूमिका मांडण्यात आली होती. चोखामेळा, रवीदास, बसवेश्वर यांसारख्या संतांनी जातीव्यवस्था पूर्णपणे नाकारली. ज्ञानेश्वर महाराजांनी गीता मराठीत आणून सर्वसामान्यांसमोर ठेवली. ईश्वर असेल तर त्याच्यासमोर सगळे समान आहेत, हे सूत्र संतसाहित्यात मांडण्यात आले, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी समतेची भूमिका उपस्थितांसमोर मांडली.
झोपडपट्टी सुरक्षा दल, दलित विकास आघाडी आणि कामगार सुरक्षा दलाच्या वतीने माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या 'लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या फकिरा कादंबरीचे इहवादी मूल्यमापन' आणि 'आंबेडकरवादी प्रतिभावंत' या दोन ग्रंथांचा प्रकाशन सोहळा पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. श्रीपाल सबनीस, ललिता सबनीस, खासदार अॅड. वंदना चव्हाण, डॉ.पी.डी.पाटील, प्रा. रतनलाल सोनाग्रा, प्रा. प्रकाश नाईक, अॅड. राहुल मल्लिक, सचिन ईटकर आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘महात्मा फुले यांच्या काळात समतेच्या चळवळीला वेग आला. त्यांनी उपेक्षित समाजाला लिखाणातून दिशा देण्याचा प्रयत्न केला. फुलेंच्या कार्यातून प्रेरणा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळून उपेक्षितांमध्ये स्वत:च्या अस्तित्वाची जाण निर्माण करण्याचे काम केले. शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, हे सूत्र दिले. अन्याय, अत्याचाराविरोधात संघर्ष करण्याचे आणि लेखणी हाती घेण्याचे बळ त्यांच्यामध्ये निर्माण केले. त्यातूनच अनेक लेखकांनी घेतलेल्या साहित्याची नोंद केवळ देशातच नव्हे, तर जगात घेतली गेली. कष्टक-यांचा विचार करायचा असेल तर डाव्या विचारसरणीचा अवलंब करण्याचे सूत्र अण्णा भाऊ साठे यांनी अवलंबले. त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू उपेक्षितांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवणे, हाच होता.’
शिंदे म्हणाले, ‘शरद पवारांनी याआधीच पुरोगामित्वाचा प्रयोग अस्तित्वात आणला. दलितांमधील सर्व जातींना त्यांनी सत्तेमध्ये सामावून घेतले. आजच्या काळात सर्वंकष दलित चळवळ उभी राहिली पाहिजे. सामाजिक समतेचा विचार आणि कृती ही सोपी गोष्ट नसते. दारिद्रय हे दलितांच्या पाचवीला पुजले आहे. मात्र, आंबेडकरांनी केलेला संघर्ष आम्हाला विसरता येणार नाही. आमच्याजवळचा दलित आम्ही आपला मानतो का, याचे प्रत्येकाने चिंतन करण्याची गरज आहे. चिंतनातूनच नव्या प्रेरणा निर्माण होतात.’भगवानराव वैराट यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.
--------
अन्याय कोणापुढे सांगणार?
हल्ली आम्हा लोकांना माजी म्हटले जाते. शिंदे यांचा उल्लेख काय करणार? केंद्रात-राज्यात विविध खात्याचे मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल अशा शिंदे यांनी इतक्या जबाबदाºया पार पाडल्या आहेत की त्यांनाच आठवत नसेल, अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली. त्यांच्यानंतर बोलायला उभे राहिलेल्या शिंदे यांनी आज माज्यावरच अन्याय झाला असल्याचे सांगितले. हे कुणापुढे सांगायचे. गुरुपुढे सांगायचे तर तेच माझ्या आधी बोलले, अशी मिश्कील टिपण्णी शिदे यांनी केली.
अर्धा गांधी, अर्धा गोडसे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे यांचे विचार वजाबाकीत विभागलेले आहेत. त्यांचे विचार एकत्रितपणे समाजापर्यंत पोचावेत. दलित, कामगार, झोपडपट्टीतील वेदना बाजूला ठेवून निर्माण झालेले साहित्य वांझ म्हणावे लागेल. सध्याची राजकीय व्यवस्था बरबटलेली आहे. वेदनामुक्तीसाठी झटणारे राजकीय नेतेही दुर्मीळ झाले आहेत. आंबेडकरांना कोणी हिरव्या, तर कोणी भगव्या रंगात बुडवू पाहत आहे. मात्र, याला न जुमानता धर्मनिरपेक्षता जपणे आणि संविधानातील मुल्ये कायम ठेवणे हेच उद्दिष्ट असायला हवे. आंबेडकरवाद्यांनी त्यांचे अस्तित्व जपणे आणि अण्णा भाऊंच्या बेरजेमध्ये उभे राहणे गरजेचे आहे. वजाबाकी बेरजेमध्ये रुपांतरित होण्याची गरज आहे. भाजपने गांधींना जवळ करण्याची लगबग चालवली आहे. त्यांना गांधीवादी व्हायचे असेल, तर गोडसे, गोळवळकारांना सोडावे लागेल. अर्धा गांधी, अर्धा गोडसे अशी भेसळ चालणार नाही.