केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई रेल्वे सुसाट
By admin | Published: February 17, 2017 03:12 AM2017-02-17T03:12:17+5:302017-02-17T03:12:17+5:30
यंदा सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेला भरीव मदत देण्यात आली. ही मदत देतानाही मुंबई उपनगरीय
मुंबई : यंदा सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेला भरीव मदत देण्यात आली. ही मदत देतानाही मुंबई उपनगरीय रेल्वे प्रथम क्रमांकावर असल्याचे समोर आले. अर्थसंकल्पात मुंबईसाठी तब्बल २९ हजार ८१२ कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर करण्यात आले. अर्थसंकल्पात मुंबईनंतर जुन्या प्रकल्पांना निधी आणि नवीन प्रकल्पांना मंजुरीच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्राचा दुसरा तर विदर्भाचा तिसरा क्रमांक लागतो. तर उत्तर महाराष्ट्राचा शेवटचा क्रमांक लागला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्पाचा समावेश करण्यात आला आणि हा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर केला. अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी हजारो कोटींचा निधी व रेल्वे प्रकल्प मंजूर करण्यात आले. मात्र मंजूर निधी व प्रकल्पांत बाजी मारली ती मुंबईने. मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी विरार-वसई-पनवेल नवीन उपनगरीय मार्ग, सीएसटी-पनवेल एलिव्हेटेड फास्ट कॉरीडोर आणि वांद्रे ते विरार एलिव्हेटेड हे नवीन प्रकल्प मंजूर करतानाच एमयूटीपी २ आणि ३साठी निधी देण्यात आला. अर्थसंकल्पात जवळपास २९ हजार ८१२ कोटी रुपयांचे प्रकल्प व निधी मिळवून मुंबई रेल्वे महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावर राहिली.
पश्चिम महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात तब्बल ७ हजार १६९ कोटी रुपयांचे नवीन प्रकल्प आणि सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी ५00 कोटी रुपये मिळाले आणि हा विभाग दुसऱ्या क्रमांकावर राहिला. पश्चिम महाराष्ट्रात पुणे-लोणावळा तिसरा-चौथा मार्ग हा सर्वांत महागडा नवीन प्रकल्प असून, त्याची किंमत ४ हजार २५३ कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली. विदर्भासाठीही अर्थसंकल्पात २ हजार १७७ कोटी रुपये मंजूर करून विदर्भवासीयांना दिलासा देण्यात आला आहे. तर १ हजार १८२ कोटींचा निधी सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी मिळाला आहे. यामुळे अमरावती, वर्धा, नागपूरमधील रेल्वे प्रकल्पांना गती मिळेल. कोकणसाठी १ हजार १0 कोटी रुपये आणि उत्तर महाराष्ट्रासाठी ४५७ कोटी रुपयांचे नवीन प्रकल्प व निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)
पश्चिम रेल्वेलाही अर्थसंकल्पात स्थान
पश्चिम रेल्वेलाही अर्थसंकल्पात चांगले स्थान मिळाले आहे. नवीन रेल्वे प्रकल्पांसाठी २ हजार ३४१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे मुंबईतील प्रवासी सुविधांसाठी १३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून यामध्ये अंधेरी, वांद्रे, खार रोड, मालाड स्थानकात नवीन पादचारी पूल बांधणे आणि पुलांची डागडुजी करणे आणि वैतरणा ते डहाणूदरम्यान आठ स्थानकांवरील प्लॅटफॉर्मचे छत बदलण्याच्या कामाचाही समावेश आहे. तसेच मुंबई सेंट्रलमध्ये पाच लिफ्ट, वांद्रे स्थानकातील ऐतिहासिक इमारतीच्या संरक्षण व दुरुस्तीसाठी १२ कोटी रुपयेही मंजूर केले आहेत.
मुंबई-दिल्ली प्रवास १२ तासांत
१मुंबई ते दिल्ली प्रवास आणखी वेगवान करण्यासाठी या मार्गावरील धावणाऱ्या ट्रेनचा वेग वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या मार्गावर धावणाऱ्या ट्रेनचा वेग ताशी १८0पर्यंत वाढवून मुंबई ते दिल्ली प्रवास १२ तासांत पार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १0३ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.
२सुमारे १0 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प बनवण्यात आला असून, यात सिग्नल, रूळ बदलणे इत्यादी कामे केली जातील. काही ठिकाणी संरक्षक भिंतही बांधण्यात येईल. ट्रेनचा वेग ताशी १६0 ते २00 किमी राहील. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर म्हणाले की, प्रथम राजधानी ट्रेनचा वेग वाढवण्याचा विचार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दिल्लीपर्यंत धावणाऱ्या अन्य ट्रेनचा वेगही वाढवला जाईल.