पत्नीची केस लढणा-या वकिलावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2017 02:24 PM2017-01-09T14:24:01+5:302017-01-09T14:24:01+5:30

पोटगीची मागणी करून कोर्टात गेलेल्या पत्नीला मदत करणा-या वकिलावर एका आरोपीने चाकूहल्ला केला.

Chakahala on the advocate fighting the case of a wife | पत्नीची केस लढणा-या वकिलावर चाकूहल्ला

पत्नीची केस लढणा-या वकिलावर चाकूहल्ला

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 9 - पोटगीची मागणी करून कोर्टात गेलेल्या पत्नीला मदत करणा-या वकिलावर एका आरोपीने चाकूहल्ला केला. जखमी पत्नीच्या मदतीला धावलेल्या वकिलाच्या पत्नीवरही आरोपीने चाकूचा वार केला. या हल्ल्यात वकील आणि त्यांची पत्नी जबर जखमी झाले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ११च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.

संजय रामभाऊ पिंगळे (वय २९) आणि अश्विनी संजय पिंगळे अशी जखमी दाम्पत्याची नावे आहेत. आरोपी सुरज विनायक केळझरकर (वय २३) उमरेडचा (जि. नागपूर) रहिवासी आहे. त्याचे श्वेता नामक तरुणीसोबत लग्न झाले होते. व्यक्तिगत कारणामुळे पटेनासे झाल्याने त्याची पत्नी श्वेता हिने सूरजच्या विरोधात काही दिवसांपूर्वी पोलिसांत आणि कोर्टात धाव घेतली. त्यांचे प्रकरण कोर्टात नेण्यासाठी वकील संजय पिंगळे यांनी मदत केल्याची माहिती सूरजला मिळाली. त्यामुळे पिंगळे यांनी तिला मदत करू नये, अशी सूरजची भावना होती. त्याला दाद न मिळाल्यामुळे सूरज संतापला. रविवारी रात्री ११ च्या सुमारास तो आपल्या एका साथीदारासह हुडकेश्वरमधील चक्रपाणी नगरात राहणारे वकील संजय पिंगळे यांच्या घरात शिरला. तुम्ही श्वेताला मदत का करता , अशी त्याने विचारणा केली. आपला व्यवसाय असल्यामुळे आपण तिची केस लढतो. आपण नाही लढली तर ती दुस-या कुण्या वकिलाकडे जाईल, असेही पिंगळेने आरोपीच्या लक्षात आणून दिले.

मात्र, ते समजून घेण्याच्या मनस्थितीत नसलेल्या सूरजने पिंगळेशी वाद घातला आणि त्यांच्या तोंडावर, पोटावर चाकूचे वार केले. पतीवर चाकू हल्ला होत असल्याचे पाहून पिंगळे यांची पत्नी अश्विनी मदतीला धावल्या असता आरोपीने त्यांच्यावरही चाकूने वार केला. या हल्ल्यात पिंगळे दाम्पत्य जबर जखमी झाले. आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावली. त्यानंतर आरोपी पळून गेले.

Web Title: Chakahala on the advocate fighting the case of a wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.