चंद्रकांतदादांनी गायले कन्नड अभिमान गीत, ‘जन्मावे तर कर्नाटकमध्येच’; सीमा भागात संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 03:35 AM2018-01-22T03:35:18+5:302018-01-22T03:35:47+5:30
सीमाभागात कर्नाटक सरकारकडून मराठी भाषकांवर होणा-या अन्यायाविरोधात महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत असताना सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्रीपद सांभाळणा-या चंद्रकांत पाटील यांनी ‘जन्मावे तर कर्नाटकमध्येच’ हे कन्नड अभिमान गीत गायल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
बेळगाव : सीमाभागात कर्नाटक सरकारकडून मराठी भाषकांवर होणा-या अन्यायाविरोधात महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत असताना सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्रीपद सांभाळणा-या चंद्रकांत पाटील यांनी ‘जन्मावे तर कर्नाटकमध्येच’ हे कन्नड अभिमान गीत गायल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या गाण्याची ध्वनीचित्रफित सोशल मीडियावर व्हायरल होताच सीमाभागातून संताप व्यक्त होत आहे.
बेळगावजवळील गोकाक तालुक्यातील तवग येथे शुक्रवारी सायंकाळी पाटील यांच्या हस्ते दुर्गादेवी मंदीर जीर्णोद्धाराचा शुभारंभ झाला. बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे सुद्धा कार्यक्रमास उपस्थित होते. चंद्रकांतदादांनी कन्नडमधून ‘जन्मावे तर कर्नाटकमध्येच जन्मावे’(हुट्टी दरे कन्नड नल्ली हुट्ट बेकू) हे दक्षिणात्य अभिनेता राजकुमार यांचे गीत गायले. कन्नडमध्ये गीत गाऊन त्यांनी कानडी लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केला.
ते म्हणाले, गेली ६१ वर्षे बेळगावात सीमावाद असला तरी कन्नड, मराठी भाषक एकदिलाने राहत आहेत, अशात भाषाभेद कसला करता? सीमावाद असला तरी एकीने, सौहार्दाने राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
मराठी युवा मंच एकीकरण समितीने पाटील यांचा निषेध केला आहे. मराठीचा द्वेष करणाºयांच्या कार्यक्रमात जाऊन कन्नडमध्ये गीत गाण्याची कृती सीमाभागातील मराठी जनांच्या भावनांवर मीठ चोळणारी आहे, असे समितीने म्हटले आहे.
भाजपाचे मराठी प्रेम बेगडी-
चंद्रकांत पाटील यांची समन्वयक मंत्रिपदावरून हकालपट्टी करून रक्तात मराठी अस्मिता असणारी व्यक्ती समन्वयक म्हणून नेमावी. भाजपाचे मराठी प्रेम किती बेगडी आहे, हे या कृतीवरुन समजते. कर्नाटकनधील आगामी विधानसभा निवडणूक डोळ््यांसमोर ठेवत कन्नड लोकांना खूश करून मते मिळविण्याचा हा प्रयत्न आहे.
- राजू पावले, एकीकरण समिती, येळ्ळूर विभाग
महाराष्ट्रातील भाजपाचे गुजराती प्रेम ज्ञात होते. आता कन्नड प्रेमही उघड झाले आहे. कर्नाटकात जाऊन कन्नड प्रेमाचे गोडवे गाणाºया मंत्री पाटील यांनी मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांनी मराठी माणसाची माफी मागावी. - धनंजय मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते