चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच काँग्रेस आघाडीला यश; हसन मुश्रीफ यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 12:39 AM2019-10-28T00:39:38+5:302019-10-28T06:22:36+5:30

बंडखोरांना भाजपकडून सर्व रसद पुरविल्याचा फायदा

Chandrakant Patil succeeded in leading the Congress; Hasan Mushrif claims | चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच काँग्रेस आघाडीला यश; हसन मुश्रीफ यांचा दावा

चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच काँग्रेस आघाडीला यश; हसन मुश्रीफ यांचा दावा

Next

कागल (जि.कोल्हापूर) : भाजपचा कोल्हापूर जिल्ह्यात दारुण पराभव का झाला याचे आत्मचिंतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करायला हवे. वास्तविक, आम्ही त्यांचे आभारी आहोत कारण त्यांनी बंडखोरी करणाऱ्यांना सर्व रसद दिली. त्यामुळेच महायुतीचे उमेदवार पडले आणि आमच्या काँग्रेस आघाडीला घवघवीत यश मिळवून देण्यात त्यांचे मोलाचे सहकार्य झाले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

मुश्रीफ म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच मतदारसंघात बंडखोर उमेदवार कसा उभा राहील याची दक्षता भाजपने घेतली. त्यांना सर्व प्रकारची रसद, यंत्रणा पुरविली. माझ्या कागल मतदारसंघात बंडखोरी केलेल्या उमेदवाराबरोबर भाजपचे सर्व कार्यकर्ते आरंभीपासूनच होते. पक्षाने आपला उमेदवार म्हणूनच त्याला सर्व प्रकारची रसद उपलब्ध करून दिली, हे उघडपणे झाले आहे. म्हणून समरजित घाटगेंना एवढी मते मिळाली आहेत. इतर मतदारसंघातही हीच परिस्थिती होती. भाजपमध्ये अनेकांना मोठ्या प्रमाणात प्रवेश दिले. तेव्हाच मी म्हटले होते की, भाजपची ताकत वाढलेली नाही, तर ही आलेली सूज आहे. त्याचे प्रत्यंतर आता पाटील यांना आले असेल. महापूर, अतिवृष्टी याची नुकसानभरपाई अजूनही मिळालेली नाही. लवकरच जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांना घेऊन हा विषय पुढे आणणार आहे.

‘समरजित घाटगेंनी ज्येष्ठांचा अपमान करू नये’
मुश्रीफ म्हणाले, समरजित घाटगे हे पराभवाने व्यथित होऊन खासदार संजय मंडलिक, संजय घाटगे आणि श्रीपतराव शिंदे यांना तुमची मते कुठे आहेत, असे म्हणून या ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करीत आहेत. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीची आकडेवारी आता देऊन त्यावरून तर्क वितर्क करणे, हे बालिशपणाचे लक्षण आहे.

पाटील यांच्या उलट्या बोंबा-मंडलिक
प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या आशीर्वादाने कोल्हापूर जिल्ह्यात बंडखोरी झाली. त्यांना थांबविण्याची जबाबदारी पाटील यांच्यावरच होती. ते न करता, पराभवाचे खापर माझ्यावर फोडणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असेच आहे, असे प्रत्युत्तर कोल्हापूरचे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी दिले आहे. बंडखोरी तुमच्या आशीर्वादाने झाली तर पराभवाची पावती माझ्या नावाने कशी काय फाडता? असा उलटा सवालही त्यांनी केला.

Web Title: Chandrakant Patil succeeded in leading the Congress; Hasan Mushrif claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.