केवळ रंगात बदल : महिला चालक अन् महिला प्रवासीही दिसेनात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 09:59 PM2017-09-10T21:59:53+5:302017-09-10T22:00:03+5:30
शहरातील रस्त्यांवर खास गुलाबी रंगाची रिक्षा फक्त महिला प्रवाशांसाठीच आणि महिलाच चालविणार, अशी अपेक्षा काही महिन्यांपूर्वी व्यक्त होत होती; परंतु प्रत्यक्षात या रिक्षा पुरुष चालक पुरुष प्रवाशांनाच घेऊन चालवीत आहेत. या रिक्षात पुरुषांचेच राज्य असल्याचे दिसते.
औरंगाबाद, दि. 10 - शहरातील रस्त्यांवर खास गुलाबी रंगाची रिक्षा फक्त महिला प्रवाशांसाठीच आणि महिलाच चालविणार, अशी अपेक्षा काही महिन्यांपूर्वी व्यक्त होत होती; परंतु प्रत्यक्षात या रिक्षा पुरुष चालक पुरुष प्रवाशांनाच घेऊन चालवीत आहेत. या रिक्षात पुरुषांचेच राज्य असल्याचे दिसते. त्यामुळे काळ्या रंगाच्या रिक्षा असताना गुलाबी रिक्षा आणून काय फरक पडला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रिक्षा प्रवास हा महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर गुलाबी रिक्षा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून राज्यात टॅक्सी व्यवसायाप्रमाणे रिक्षा व्यवसायातही महिलाराज यावे, यासाठी प्रयत्न करण्यात आला. महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, असा उद्देश गुलाबी रिक्षा सुरू करताना होता. त्यासाठी महिलांसाठी रिक्षांचे परवाने आरक्षित ठेवण्यात आले. या परवान्यांवरील रिक्षांना गुलाबी रंग निश्चित करण्यात आला.
आरटीओ कार्यालयाकडून महिलांसाठी विशेष अशा गुलाबी रंगाच्या रिक्षांचे जवळपास २२ परवाने देण्यात आले. या गुलाबी रिक्षा फक्त महिलांसाठीच असतील. म्हणजे चालक महिलाच राहील आणि या रिक्षाने फक्त महिला प्रवाशांची वाहतूक होईल, असे सांगितले जात होते; परंतु शहरातील रस्त्यांवरील चित्र प्रत्यक्षात वेगळे आहे. अद्याप तरी गुलाबी रिक्षा चालविताना महिला चालक दिसत नाहीत. पुरुषांकडून या रिक्षा चालविण्यात येत आहेत. शिवाय त्यात पुरुष प्रवाशांचीच वाहतूक होत आहे. त्यामुळे गुलाबी रिक्षा भाड्याने देण्याचा प्रकार होत आहे, हे स्पष्टच. केवळ रिक्षांचा रंग बदलला आहे. महिला सुरक्षेचे कोणतेही पाऊल पडलेले नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
अधिकारी म्हणतात...
गुलाबी रिक्षा कोणी चालवावी, त्यात प्रवासी कोण असावेत, याबाबत आरटीओ कार्यालयातील अधिका-यांकडून वेगवेगळी उत्तरे मिळतात. रिक्षा परवानाधारक महिला अथवा तिच्या पतीस ही रिक्षा चालविण्याची मुभा आहे, असे काही अधिका-यांचे म्हणणे आहे, तर दिवसभरात एका शिफ्टमध्ये परवानाधारक महिलेने रिक्षा चालविली पाहिजे, असे काही अधिकारी सांगतात.
कोणीही चालवू शकतो
परवानाधारक महिलेने रिक्षा चालविली तर अधिक चांगले आहे; परंतु गुलाबी रिक्षा कोणीही चालवू शकतो. उत्पन्नाचे साधन मिळावे, या हेतूने महिलांना रिक्षा परवाने देण्यात आले. कोणत्याही प्रवाशाची वाहतूक करता येते.
- निसार अहेमद, रिक्षाचालक संयुक्तसंघर्ष कृती महासंघ