हेलिकॉप्टर खरेदीत मुख्यमंत्र्यांनी रुपयाचे आणखी अवमुल्यन केले : निरुपम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 07:08 PM2018-09-12T19:08:50+5:302018-09-12T19:09:29+5:30
फडणवीस यांनी शासनातर्फे २ हेलिकॉप्टर्स खरेदीसाठी एका अमेरिकन कंपनीशी करार केला आहे. या करारासाठी ग्लोबल टेंडर इश्यू करण्यात आला. निश्चितच ही टेंडरिंग डॉलरमध्ये झाली. या टेंडरमध्ये त्यांनी रुपयाचा भाव १ डॉलरमागे ८० रुपये असल्याचे नमूद केलेले आहे.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टर खरेदीच्या करारामध्ये काल जे रुपयाचे अवमूल्यन केले, यावरून त्यांचा त्यांच्या सरकारवर विश्वास राहिलेला नाही, त्यांचे सरकार ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारू शकत नाही, हेच स्पष्ट होते, अशी टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले.
फडणवीस यांनी शासनातर्फे २ हेलिकॉप्टर्स खरेदीसाठी एका अमेरिकन कंपनीशी करार केला आहे. या करारासाठी ग्लोबल टेंडर इश्यू करण्यात आला. निश्चितच ही टेंडरिंग डॉलरमध्ये झाली. पण ग्लोबल टेंडरिंग करताना त्या दिवशी रुपयाचा दर डॉलर मागे किती आहे? हे पाहूनच त्या वस्तूची किंमत ठरते. काल रुपयाचा भाव १ डॉलरमागे ७२.६ रुपये होता. पण या टेंडरमध्ये त्यांनी रुपयाचा भाव १ डॉलरमागे ८० रुपये असल्याचे नमूद केलेले आहे. जरी आज रुपयाची स्थिती १ डॉलरमागे ७२.६ इतकी खराब असली, भाजप सरकार हे कसे गृहीत धरू शकते की, हा करार जेव्हा अंतिम टप्प्यात असेल तेव्हा रुपया १ डॉलरमागे ८० रुपये असेल. अशी मुख्यमंत्र्यांना खात्री आहे का? रुपयाच्या अवमूल्यनामागे भाजपचा हात आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
१५० करोड रुपयांचा हा व्यवहार आहे, रुपयाचा भाव 1 डॉलरमागे 80 रुपये दाखवल्याने सरकारला १८ करोड रुपयांचा तोटा होत आहे. सरकार १८ करोड जास्त का देत आहे. १५० करोड रुपयांचे हेलिकॉप्टर्स घेण्यासाठी महाराष्ट्राकडे पैसे आहेत का? महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत. गाव-खेड्यांतील लोक उपाशी मारत आहेत. डिझेल पेट्रोल महाग होत आहे. आम्ही जेव्हा पेट्रोल डिझेलवरील व्हॅट १ रुपया कमी करायची मागणी करतो, तेव्हा तुम्ही सांगता की असे केले, तर ३ हजार करोड रुपयांचा महसूल बुडेल. म्हणजे तुम्ही सरकारमध्ये बसून एक एक पैसा लोकांच्या खिशातून काढता आणि सरकारची तिजोरी भरता, मग स्वतःसाठी १८ करोड रुपये तोटा सहन करून एवढे महाग हेलिकॉप्टर विकत का विकत घेत आहेत? हा अट्टाहास का? या करारामध्ये १ डॉलरमागे रुपया किंमत ८० रुपये का टाकली आहे. यामध्ये कोणी दलाली केली आहे का? ही शासनाची चूक आहे. हा करार रद्द झालाच पाहिजे. या कराराच्या पैशांनी मुख्यमंत्र्यांनी जनतेसाठी इतर विधायक कामे करावीत. महाराष्ट्रातील जनतेला १५० करोडची हेलिकॉप्टर्स नको आहेत. त्यांना इतर सोयीसुविधा हव्या आहेत. त्यांना स्वस्त पेट्रोल डिझेल हवे आहे. त्यांना महागाई नको आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.