चिनी मालाची आयात घटली
By admin | Published: October 31, 2016 01:57 AM2016-10-31T01:57:12+5:302016-10-31T01:57:12+5:30
यंदाच्या दिवाळीत चिनी मालाची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ४५ टक्क्यांनी घटल्याचे कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स यांनी म्हटले आहे.
मुंबई : सोशल मीडियावरून चिनी वस्तूंवर बंदी घालण्याच्या पोस्ट्समुळे यंदाच्या दिवाळीत चिनी मालाची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ४५ टक्क्यांनी घटल्याचे कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स यांनी म्हटले आहे. याउलट, १० वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा मातीच्या वस्तूंची मागणी अधिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने देशातील विविध शहराच्या व्यापारी संघटनांच्या बैठकीतून काढलेल्या निष्कर्षात ही माहिती समोर आली आहे. याविषयी, कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भरतिया यांनी सांगितले की, सोशल मीडियावरील चिनी मालाच्या बहिष्काराच्या शेअरिंगमुळे व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीतील भारत-पाकमधील धुसफूस आणि चीनबद्दलची परिस्थिती सामान्यांपर्यंत पोहोचली आहे. विशेषत: उत्सवाच्या काळात गृहिणी आणि लहान मुले खरेदी करण्यासाठी आघाडीवर असतात. या सर्वांचा उत्सवकाळात खरेदीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल, याच कारणास्तव व्यापाऱ्यांनी चिनी मालावर बहिष्कार घातला आहे. (प्रतिनिधी)