शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवा, शेतीसाठी पतपुरवठा करा; मुख्यमंत्र्यांच्या बँकांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 03:44 PM2019-05-29T15:44:37+5:302019-05-29T15:46:10+5:30

शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं आवाहन

cm devendra fadnavis orders bank officers to provide loans to farmer | शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवा, शेतीसाठी पतपुरवठा करा; मुख्यमंत्र्यांच्या बँकांना सूचना

शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवा, शेतीसाठी पतपुरवठा करा; मुख्यमंत्र्यांच्या बँकांना सूचना

Next

मुंबई: राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बँकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बँकांनी पतपुरवठा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत दिले. दरम्यान, यावेळी राज्याच्या 4 लाख 24 हजार 29 कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यास मंजुरी देण्यात आली.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव यांच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सन 2019-20 साठीच्या मंजूर केलेल्या 4 लाख 24 हजार 29 कोटी रुपयांच्या एकूण वार्षिक पतपुरवठा आराखड्यात कृषिक्षेत्रासाठी 87 हजार 322 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

गेल्या वर्षीच्या पीक कर्जाच्या उद्दीष्टपूर्तीची आकडेवारी पाहून मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एकूण उद्दीष्टाच्या केवळ 54 टक्केच साध्य झाले ही गंभीर बाब असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, केवळ सादरीकरणासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक नाही. या बैठकीत जे निर्णय घेतले जातात ते बँकांनी त्यांच्या क्षेत्रीय स्तरावरील शाखांपर्यंत पोहोचवले पाहिजे. बँकांनी शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवावी. उद्दिष्टपूर्तीसाठी  जबाबदारी निश्चित करावी. बँकांच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना चांगली वागणूक द्यावी. कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावीस जेणे करून शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना अडचणी येणार नाहीत.

शाश्वत शेतीसाठी कृषि क्षेत्रात गुंतवणूक वाढली पाहिजे. बँकांचे पीक कर्जाचे उद्दिष्ट आणि साध्य यात तफावत असू नये. शेतकऱ्यांप्रति असणारी भावना बँकांनी बदलणे गरजेचे आहे असे स्पष्ट करतानाच जास्तीत जास्त पीक कर्जाचे वाटप झाले पाहिजे. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती  ग्रामीण भागातील बँकांच्या शाखांपर्यंत पोहोचावेत यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

केंद्र शासनाच्या मुद्रा बँक, प्रधानमंत्री जनधन योजना, स्टँड अप इंडिया, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना यासारख्या योजनांमधील पतपुरवठ्याची कामगिरीदेखील सुधारली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीला राज्य प्रशासनातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, विविध राष्ट्रीयकृत बँकांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: cm devendra fadnavis orders bank officers to provide loans to farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.