महाविद्यालय मान्यताप्रश्नी मनविसे आक्रमक
By admin | Published: May 18, 2015 04:19 AM2015-05-18T04:19:05+5:302015-05-18T04:19:05+5:30
राज्यात आगामी शैक्षणिक वर्षात नवीन महाविद्यालय आणि अतिरिक्त तुकड्यांना मान्यता न देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे
मुंबई: राज्यात आगामी शैक्षणिक वर्षात नवीन महाविद्यालय आणि अतिरिक्त तुकड्यांना मान्यता न देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. या प्रश्नी युवा सेनेने शिक्षणमंत्र्यांना आव्हान दिल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनेही या निर्णयाला विरोध दर्शविला असून, लवकरच मनविसे शिष्टमंडळ शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार आहे. चर्चेनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा निर्णय मागे न घेतल्यास मनविसेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
महाविद्यालयांमध्ये गतवर्षी २५ टक्के जागा रिक्त राहिल्याने २0१५-१६ या शैक्षणिक वर्षात नवीन महाविद्यालये आणि तुकडीवाढ न देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने एप्रिल महिन्यात घेतला आहे. याबाबतचा अध्यादेशही या विभागाने जारी केला आहे. विद्यापीठांनी नवीन महाविद्यालये आणि तुकड्यांचे प्रस्ताव विद्यापीठाच्या प्राधिकरणांमध्ये मंजूर करून ते शासनाकडे मंजूुीसाठी पाठविले आहेत. असे असतानाच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने रिक्त जागांचे कारण पुढे करीत नवीन महाविद्यालये आणि तुकडीवाढ देण्यात येणार नसल्याचा निर्णय घेतला.
उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी शिक्षण संस्थाचालक आणि विद्यापीठांच्या बीसीयूडीचे संचालक यांची नुकतीच मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीनंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राज्यमंत्री यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे.