“सांगलीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा बेसच नाही, विशाल पाटलांनी...”; नाना पटोले स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 03:19 PM2024-04-16T15:19:20+5:302024-04-16T15:19:27+5:30
Congress Nana Patole News: सांगलीच्या जागेवरून केवळ कार्यकर्ते नाही, तर मीही नाराज आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. ठाकरे गटाने फेरविचार करावा, असे नाना पटोले म्हणाले.
Congress Nana Patole News: महाविकास आघाडीत काम करताना सांगलीची जागा ठाकरे गटाला सुटली आहे. मात्र, तिथे ठाकरे गटाच्या उमेदवाराचा काही बेसच नाही. तरीही महाविकास आघाडी म्हणून आम्हाला तिथे काम करावे लागेल. सांगलीत विश्वजित कदम यांच्यापासून स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. तसेच विशाल पाटील यांनी बंडखोरी करत दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर सूचक भाष्य केले.
महाविकास आघाडीसोबतच राहायचे आहे. सांगलीच्या जागेबाबत केवळ कार्यकर्त्यांचा नाही, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून माझाही हिरमोड झालेला आहे. मात्र, आघाडीत असताना चर्चा झाल्यावर आपल्याला गोष्टी निभावून न्यायच्या असतात. चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या पाठिशी उभे राहू, असे नाना पटोले यांनी नमूद केले. तसेच ठाकरे गटाने सांगलीच्या जागेबाबत फेरविचार केल्यास चांगले आहे. मोदी सरकारला हटवण्यासाठी एक एक जागा महत्त्वाची आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे शक्य असेल तर निर्णय घेता येऊ शकेल, असा आशावाद नाना पटोलेंनी व्यक्त केला.
काँग्रेसचा एबी फॉर्म तयार आहे
विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला आहे. विशाल पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, ठाकरे गटाचा काही बदलाचा निर्णय झाला, तर काँग्रेसचा एबी फॉर्म तयार आहे. परंतु, ठाकरे गटाने ती जागा लढवायचीच असे ठरवले आहे. अशावेळेस त्यांना आम्ही काही जबरदस्ती करू शकत नाही. त्यांना जे चांगले वाटत आहे, ते करतील, असे आम्हाला वाटते. ठाकरे गटाने बदलाचा निर्णय घेतला नाही आणि चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम राहिली, तर विशाल पाटील यांना आम्ही समजवू आणि माघार घ्यायला सांगू, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सांगलीबाबत काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीने खूप मोठी चूक केली. जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधून, प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. अर्ज भरला पाहिजे असा कार्यकर्त्यांचा सूर होता. भाजपाला हरवायचे असेल तर इथे सक्षम उमेदवार द्यायला हवा होता असे म्हणत कार्यकर्त्यांनी आपण अर्ज भरून पक्षाकडे मागणी करावी असे म्हटले. ३८ हजार काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत आम्ही चर्चा केली. त्याचाच भाग म्हणून निवडणुकीत अर्ज भरले आहेत, असे विशाल पाटील यांनी सांगितले.