'महाराष्ट्रात काँग्रेसने जात पंचायत नेमली; पण नेतृत्वासाठी पक्ष उरला आहे का?'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 07:35 AM2019-07-15T07:35:20+5:302019-07-15T09:26:13+5:30

राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देताच बुडत्या जहाजातून अनेकांनी उड्या मारल्या. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांनीही ‘त्यागपत्र’ दिले. काँग्रेस पक्षात ‘त्याग’ शब्दाशी संबंध असलेले कोणी उरले आहे काय? हा प्रश्नच आहे.

'Congress nominated caste panchayat in Maharashtra; But is there a party to leadership? Says Shiv Sena | 'महाराष्ट्रात काँग्रेसने जात पंचायत नेमली; पण नेतृत्वासाठी पक्ष उरला आहे का?'

'महाराष्ट्रात काँग्रेसने जात पंचायत नेमली; पण नेतृत्वासाठी पक्ष उरला आहे का?'

Next

मुंबई - राहुल गांधी यांच्या रिकाम्या जागी काँग्रेसला ‘नगास नग’ तर मिळालेला नाहीच, पण महाराष्ट्रातही अशोक चव्हाण यांनी राजीनामा देऊन महिना उलटून गेला तरी नवा प्रदेशाध्यक्ष मिळत नव्हता. अखेर आता त्या पदावर बाळासाहेब थोरात विराजमान झाले, पण त्यांच्या दिमतीला महाराष्ट्रात ‘जात’निहाय पाच कार्याध्यक्षही पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. काँग्रेसच्या डोक्यातील जात व धर्माचे खूळ काही जात नाही. विदर्भातील नितीन राऊत (अनुसूचित जाती), विदर्भाच्याच यशोमती ठाकूर (इतर मागासवर्गीय), मुजफ्फर हुसेन (मुस्लिम), विश्वजित कदम (मराठा), बसवराज पाटील (लिंगायत) अशी ही जात पंचायत काँग्रेसने नेमली असली तरी लोकसभा निवडणुकीत त्यापैकी एकही समाज काँग्रेसच्या मागे उभा राहिलेला दिसत नाही असा टोला सामना संपादकीयमधून काँग्रेसला लगावला आहे. 

तसेच  बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे जुनेजाणते नेते आहेत. त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे, सहकारातले ज्ञानी आहेत. महाराष्ट्राचे नेतृत्व त्यांना मिळाले, पण नेतृत्वासाठी पक्ष उरला आहे काय? असा सवालही शिवसेनेने केला. 

सामना संपादकीयमधील महत्वाचे मुद्दे

  • अशोक चव्हाण यांच्या रिकाम्या जागी बाळासाहेब थोरात यांची नेमणूक करण्यात आली आहे. चव्हाण गेले व थोरात आले. अर्थात त्यामुळे असा काय फरक पडणार आहे? काँग्रेसचे आभाळ फाटून पार जमीनदोस्त झाले आहे. पक्ष जमिनीवर शिल्लक नाही. 
  • ज्यांनी वर्षानुवर्षे काँग्रेसची वतनदारी केली, सर्वोच्च पदे मिळवली असे सर्व प्रमुख लोक महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात काँग्रेसचा त्याग करीत आहेत. महाराष्ट्रातही वेगळे काही घडताना दिसत नाही. काँग्रेस हा राजकीय पक्ष नसून विचार आणि संस्कृती आहे असे सतत सांगितले जाते. हा विचार, संस्कृती आणि बरेच काही भाजप किंवा शिवसेनेत रोजच विलीन होताना दिसत आहे. 
  • काँग्रेसला राजकीय भविष्य उरलेले नाही. त्यामुळे या ओसाड वाडय़ात आता कोणते विचार, कोणत्या संस्कृतीचे रोपटे लागणार हा विचार अनेकांनी केला आणि या वाडय़ातून काढता पाय घेतला. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते भाजपात विलीन झाले, त्याचप्रमाणे गोवा विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते 10 आमदारांसह भाजपात विरघळून गेले आहेत. 
  • राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देताच बुडत्या जहाजातून अनेकांनी उड्या मारल्या. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांनीही ‘त्यागपत्र’ दिले. काँग्रेस पक्षात ‘त्याग’ शब्दाशी संबंध असलेले कोणी उरले आहे काय? हा प्रश्नच आहे. सत्ताधारी म्हणून सोडाच, पण विरोधी पक्ष म्हणून तरी काँग्रेसने धड जबाबदारी पार पाडली आहे असे दिसत नाही. 
  • काँग्रेसची धुरा सांभाळून पक्ष पुढे नेईल असे नवतरुण नेतृत्व काँग्रेस पक्षात उरलेले नाही. तेच तेच घासून गुळगुळीत झालेले ‘गोटे’ पुनः पुन्हा पदावर बसवले जात आहेत. काँग्रेस असेल किंवा अन्य कोणी, संसदेत व विधानसभेत विधायक विरोधी पक्ष असावा या मताचे आम्ही आहोत. 
  • साठ वर्षे सत्ता भोगल्यावर विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडणे हे काँग्रेसचे कर्तव्यच ठरते. लोकसभेत काँग्रेसची इतकी घसरण झाली की, विरोधी पक्षनेतेपदाचा अधिकृत दर्जाही त्या पक्षाला मिळाला नाही. 
  • महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर आहे. बाळासाहेब थोरात यांना एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला उभे करावे लागेल. यापुढील काळात जुने आणि नवे असे सर्वजण एकदिलाने काम करू आणि काँग्रेस पक्षाला राज्यात उभारी देऊ असे थोरात यांनी पद स्वीकारल्यानंतर म्हटले आहे. 
  • प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यावर असे बोलणे ठीक आहे, पण काँग्रेस पक्षाचा एकंदर इतिहास पाहता हे ‘एकदिलाने’ वगैरे शब्द त्या पक्षाच्या शब्दकोशात आणि प्रत्यक्ष व्यवहारातही कधीही दिसले नाहीत. 
  • थोरात यांच्यासोबतच जे पाच कार्याध्यक्ष नेमले गेले आहेत त्यांची तोंडे जरी निवडणुकीपर्यंत पाच दिशांना झाली नाहीत तरी खूप झाले असे म्हणता येईल. 

Web Title: 'Congress nominated caste panchayat in Maharashtra; But is there a party to leadership? Says Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.