आई-वडिलांच्या मतदानावेळी मुलांमध्ये वाद
By admin | Published: October 16, 2014 10:30 PM2014-10-16T22:30:45+5:302014-10-16T22:53:40+5:30
अखेर दृष्टी अधू झालेल्या वृध्दाने मतदान केलेच नाही.. राजकीय अभिनिवेशामुळे नाती तुटू नयेत
बाबासाहेब परीट - बिळाशी --नात्यात राजकारण नसावं. राजकारणातही नाती जपावीत, पण कधी-कधी राजकारण नाती तोडतं. राजकीय अभिनिवेशामुळे आई-बापाला वेठीस धरून वाटणीचा हिशेब मांडण्याचा अनोखा प्रकार शिराळा तालुक्यातील एका धनिक गावातील मतदान केंद्रावर नुकताच घडला. अखेर दृष्टी अधू झालेल्या वृध्दाने मतदान केलेच नाही.
शिराळा तालुक्यात नगदी पिकात अग्रेसर असणाऱ्या एका गावात सकाळी लवकर मतदान केंद्रावर आपल्या वृद्ध आई-वडिलांना घेऊन त्यांचा मुलगा आला. ही बातमी त्यांच्या दुसऱ्या मुलाला विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांनी मोबाईलवरुन सांगितली. त्यामुळे तोही तेथे आला. त्या वृध्द दाम्पत्याला चार मुले. ती चारही वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी निगडीत आहेत. बापाची इच्छा वेगळ्याच उमेदवाराला मत देण्याची. ज्यानं आई-बापाला मतदान केंद्रावर आणलं होतं, त्यानं चार दिवसांपूर्वी आई-बापाला सांभाळण्यासाठी आणलं होतं. ज्यानं आणलं, तो म्हणत होता, दोघांचे मतदान मीच करणार. पण यापूर्वी ज्या मुलाने आई-बापाला सांभाळलं होतं, तोही म्हणत होता, मी त्यांचं मतदान करणार. या गोंधळात आईचं मतदान एका लेकाने केलं आणि बापाच्या मतदानावेळी अटी-तटीचा सामना सुरू झाला. शेवटी वैतागून बापाने मतदान केंद्रावरील लोकांना फर्मावले, ‘आरं, माझंच मत मला द्यायला येईना, तर काय उपेग? मला घरला न्या. माझी वाटणी केलीसा. आता माझ्या मताची वाटणी तुम्हाला करता येणार नाय.’ असं म्हणून ते रिक्षात जाऊन बसले.
शेवटी राजकारणापेक्षा नाती महत्त्वाची असतात. राजकारण आणि नात्यात गफलत होता कामा नये आणि राजकीय अभिनिवेशामुळे नाती तुटू नयेत, हे तिथं कुणी सांगावं? कारण ते ठिकाण सांगण्याचं नव्हतं आणि ऐकण्याच्या स्थितीत तर कोणीच नव्हतं.
राजकीय अभिनिवेशामुळे नाती तुटू नयेत
शेवटी राजकारणापेक्षा नाती महत्त्वाची असतात. राजकारण आणि नात्यात गफलत होता कामा नये आणि राजकीय अभिनिवेशामुळे नाती तुटू नयेत, हे तिथं कुणी सांगावं? कारण ते ठिकाण सांगण्याचं नव्हतं आणि ऐकण्याच्या स्थितीत तर कोणीच नव्हतं. राज्यकर्त्यांनीच भान ठेवून नाती टिकविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.