Maharashtra Election 2019 :धरणे भरण्यापेक्षा स्वयंपाक बरा; उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 06:48 AM2019-10-15T06:48:16+5:302019-10-15T06:50:47+5:30
झुणका-भाकर योजना गेली कुठे? शरद पवारांचा उद्धव यांना सवाल
मुंबई :विधानसभा निवडणुकीचा प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप-शिवसेनेचे नेते व राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चांगलेच वाक्युद्ध रंगले आहे. धरणं भरण्यापेक्षा स्वयंपाक बरा, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवारांना लगावला, तर दहा रुपयांत थाळी योजनेवर पवारांनी टीका केली होती.
विधानसभा निवडणुकीतही सत्ताधारी पक्षाने शरद पवारांनाच टार्गेट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस पवारांवर सडकून टीका करीत आहेत. तुम्ही सत्तेच्या पंधरा वर्षांच्या काळात काय काम केले, असा सवाल शहा यांनी पवारांना विचारला, तर समोर पहिलवान नसल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. आता या वाक्युद्धात उद्धव ठाकरे यांनीही उडी घेतली आहे.
शिवसेनेने वचननाम्यात दहा रुपयांत पोटभर जेवण देण्याचे आश्वासन दिले आहे. यावर तुम्ही सरकार चालविणार की स्वयंपाक करणार? तुमची झुणका-भाकर योजना कुठे गेली, असे सवाल पवार यांनी केला. ही टीका शिवसेनेच्या जिव्हारी लागली. जनतेसाठी आम्ही स्वयंपाक करू, पण आम्हाला तुमच्या पुतण्याने भरलेल्या ‘त्या’ धरणातले पाणी नको, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला. शिवसेनाप्रमुख असले असते, तर असा मित्र नको, असे म्हणाले असते. स्वत: काही चांगलं करायचं नाही आणि जे चांगलं करतात, त्याला करू द्यायचे नाही, अशी पवारांची नीती आहे. शरद पवार आधी उडी घेतात आणि पुन्हा ओरडत बसतात, अशी टीकाही त्यांनी केली.
पंतप्रधान, गृहमंत्री यांना माझे नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही. ही गोष्ट चांगली आहे. शरद पवार, शरद पवार आणि शरद पवार, असा माझ्या नावाचा जप केला जातोय. मी सत्तेत नसतानाही ते दोघेही माझ्यावर टीका करतात. त्यांना झोपेतही मीच दिसतो.
- शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
आम्ही आमच्या वचननाम्यात १ रुपयात आरोग्य तपासणीची घोषणा केली आहे़ मात्र, हे (शरद पवार) त्यावरही ओरडत सुटले आहेत़ हा निव्वळ विघ्नसंतोषीपणा आहे़ गरज असेल तर या योजनेतून आम्ही तुमचीही डोक्यापासून पायापर्यंत तपासणी करू.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख