कोपर्डी प्रकरण : खटल्यात हवी मुख्यमंत्र्यांची साक्ष!
By admin | Published: June 24, 2017 04:15 AM2017-06-24T04:15:51+5:302017-06-24T04:15:51+5:30
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात साक्षीदार म्हणून थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करावा
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात साक्षीदार म्हणून थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करावा, अशी मागणी बचाव पक्षाने केली आहे़ बचाव पक्षाच्या वकिलांनी साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्री फडणवीस यांचा समावेश केला असून तसा अर्ज न्यायालयाकडे केला आहे. येत्या ७ जुलै रोजी यावर सुनावणी होणार आहे़
जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर कोपर्डी खटल्याची सुनावणी सुरू आहे़ या खटल्यातील आरोपी नितीन गोपीनाथ भैलुमे याचे वकील अॅड़ प्रकाश आहेर यांनी शुक्रवारी न्यायालयात अर्ज सादर केला़ या खटल्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एका वृत्तपत्राच्या संपादकांचा साक्षीदारांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी अर्जात करण्यात आली. कोपर्डी घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत व वृत्तवाहिन्यांशी बोलताना आरोपींना फाशी होणार असल्याचे वक्तव्य केले होते़ त्याच अनुषंगाने त्यांचा साक्षीदाराच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली असल्याचे अॅड़ आहेर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले़ आता याबाबत न्यायालयात काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़
आरोपी नितीन भैलुमे याचा न्यायालयात ३१३ अंतर्गत जबाब नोंदवून घेण्यात आला़ साक्षीदारांनी घटनेविषयी दिलेली माहिती आरोपीला सांगून त्याचे म्हणणे ऐकून घेण्यात आले़ भैलुमे याने साक्षीदारांनी दिलेल्या माहितीबाबत कल्पना नसल्याचे सांगितले़