वृक्षलागवडीसाठी स्वतंत्र ‘पॅटर्न’ तयार करणार

By admin | Published: May 30, 2017 03:10 AM2017-05-30T03:10:47+5:302017-05-30T03:10:47+5:30

वृक्षलागवड कार्यक्रमामधून बिहारच्या धर्तीवर राज्याचा स्वतंत्र ‘पॅटर्न’ तयार करण्यात येणार आहे. रेल्वेच्या जागांवर वृक्षलागवड

Create a separate 'pattern' for the tree | वृक्षलागवडीसाठी स्वतंत्र ‘पॅटर्न’ तयार करणार

वृक्षलागवडीसाठी स्वतंत्र ‘पॅटर्न’ तयार करणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वृक्षलागवड कार्यक्रमामधून बिहारच्या धर्तीवर राज्याचा स्वतंत्र ‘पॅटर्न’ तयार करण्यात येणार आहे. रेल्वेच्या जागांवर वृक्षलागवड करण्यासाठी राज्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून, रेल्वे प्रशासनासोबत त्याबाबत बोलणी सुरू आहेत. राज्यामध्ये रेल्वेच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून रेल्वेसोबत एक वर्षाचा करार झाल्याची माहिती वित्त, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
मुनगंटीवार यांनी विधान भवनामध्ये पुणे महसूल विभागाची वृक्षलागवड कार्यक्रमासंदर्भात तयारीची आढावा बैठक घेतली. या बैठकीला वनविभागाचे सचिव, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, आमदार दत्तात्रय भरणे, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, डॉ. नीलम गोऱ्हे, शरद रणपिसे यांच्यासह पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, सोलापूरचे जिल्हाधिकारी, पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार, उपवन संरक्षक रंगनाथ नाईकडे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यामध्ये १ ते ७ जुलैदरम्यान चार कोटी वृक्षलागवड कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीची सर्व माहिती संकेतस्थळावर टाकली जात असून, आजमितीस ४१ लाख २६ हजार खड्डे तयार आहेत. १ कोटी ८७ लाख रोपे तयार असल्याचे त्यांनी सांगितले. निरोगी वृक्ष लागवडीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून वनविभागाने गेल्या वर्षी लागवड केलेल्या वृक्षांच्या जगण्याचे प्रमाण ८५ टक्के तर अन्य विभागांचे प्रमाण ७५ टक्के आहे. पुणे जिल्ह्यातील रेल्वेच्या जागांवर २ हजार, मोहोळला ६ हजार ६६६, कुर्डूवाडीमध्ये १ हजार ५५५ वृक्ष लावण्यात येणार आहेत.
वनविभागातर्फे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हॅलो फॉरेस्ट १९२६ या नि:शुल्क सेवेची सुरुवात करण्यात आली असून, ही देशातील पहिली हेल्पलाईन आहे. यासोबतच रोप आपल्या दारी उपक्रम राबवण्यात येत आहे. हरीत सेनेच्या माध्यमातून १ कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट असून आतापर्यंत २५ लाख नोंदणी झाली आहे. संगणकीय प्रणालीचा अधिकाधिक वापर करण्यात येत आहे. पारदर्शकता ठेवण्यासोबतच नागरिकांमधील नकारात्मकता कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी विभागवार बैठका घेण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मनरेगाच्या माध्यमातून एक कुटुंब एक हजार झाडे असा प्रकल्प राबवणार आहे. आगामी काळात वनयुक्त शिवार हा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. राज्यभरात वनविभागाच्या जागांवर भिंतींचे कुंपण घालण्यात येत आहे.
या वेळी वनविभागाचे सचिव विकास खारगे, वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) श्री भगवान, प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण अनुराग चौधरी, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण डॉ. दिनेशचंद्र त्यागी, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) पुणे विवेक खांडेकर, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
प्रारंभी संत तुकाराम वनग्राम योजने अंतर्गत पुणे जिल्हास्तरावरील पुरस्काराचे वितरण करण्यात आले. वनसंरक्षण समिती घेरासिंहगड यांना प्रथम, तर वन संरक्षण समिती सांडभोरवाडी,खेड यांना व्दितीय क्रमांकाचे अनुक्रमे ५१ हजार व ३१ हजार रुपयांचे पारितोषिक वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


लातूरमध्ये केवळ एक टक्काच वनक्षेत्र आहे. संरक्षण विभागासोबत करार करण्यात आला असून लातूरमध्ये त्यांच्या जागांवर वृक्षांची लागवड आणि संवर्धन केले जाणार आहे. वृक्ष स्वत:चे पोषण करु शकतील एवढी वाढ होईपर्यंत शासनामार्फत वाढवले जाणार आहेत. इको बटालियनच्या माध्यमातून लातूरमध्ये वनक्षेत्र वाढवण्यावर भर देणार आहे.


ट्री क्रेडिटवर काम सुरु असून त्यासाठी समिती नेमण्यात आली होती.
या समितीचा अहवाल आलेला आहे. कायद्यामध्ये काही प्रमाणात बदल करावा लागणार आहे. आगामी काळात ट्री क्रेडिटसंदर्भात निर्णय
घेतला जाईल.
मुंबईजवळील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जुन्नरसह चंद्रपूरमध्ये बिबट्या सफारी सुरु करण्यात येणार आहे. राज्यामध्ये वर्षाला ४५ वाघ किंवा बिबट्या मृत्युमुखी पडत होते. ते प्रमाण आता २५ वर आणण्यात यश
आले आहे.

Web Title: Create a separate 'pattern' for the tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.