नारायण साटम यांना दाजी भाटवडेकर स्मृती पुरस्कार
By Admin | Published: December 22, 2014 03:32 AM2014-12-22T03:32:27+5:302014-12-22T03:32:27+5:30
मराठी साहित्य संघ आणि डॉ. दाजी भाटवडेकर स्मृती सेवायन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी डॉ. दाजी भाटवडेकर स्मृतिदिन साजरा केला जातो.
मुंबई : मराठी साहित्य संघ आणि डॉ. दाजी भाटवडेकर स्मृती सेवायन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी डॉ. दाजी भाटवडेकर स्मृतिदिन साजरा केला जातो. यंदा साहित्य संघाने ८०व्या वर्षात पदार्पण केले असून, या अष्टदशक पर्वातील नाट्यसेवा गौरव पुरस्कारही दिले जाणार आहेत. यावर्षी ज्येष्ठ रंगकर्मी नारायण साटम हे डॉ. दाजी भाटवडेकर स्मृती सेवायन पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
यंदाचा साहित्य पुरस्कार वितरण सोहळा २५ डिसेंबर रोजी साहित्य संघाच्या डॉ. भालेराव नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता पार पडेल. या सोहळ््याला संघाध्यक्ष मधु मंगेश कर्णिक उपस्थित राहतील. मुंबई मराठी साहित्य संघ आणि महाराष्ट्र स्नेहवर्धक मंडळ पुरस्कृत रंगभूषाकारासाठी कृष्णा बोरकर यांना गौरविण्यात येणार आहे. तर मुंबई मराठी साहित्य संघ आणि प्रभाकरपंत जोशी ट्रस्ट, लीला मेहता पुरस्कृत मराठी लोकनाट्य कलावंत मेघा घाडगे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
मुंबई मराठी साहित्य संघ आणि श्यामा खोत पुरस्कृत डॉ. मधुकर आष्टीकर स्मृतिप्रीत्यर्थ विनोदी नाट्यलेखनासाठी लेखक विवेक बेळे यांचा गौरव करण्यात येईल. तर साहित्य संघ आणि रजनी मेहता स्मृतिप्रीत्यर्थ सर्वोत्कृष्ट स्त्री-कलावंत या पुरस्काराचे मानकरी शकुंतला नरे ठरल्या आहेत. या पुरस्कार सोहळ््यानंतर मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या नाटकांतील गाण्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमात अनेक कलावंत सहभागी होतील. (प्रतिनिधी)