मराठा समाजाला गृहीत धरण्याचे दिवस आता संपले - शाहू महाराज यांनी ठणकावले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 03:00 AM2017-08-09T03:00:05+5:302017-08-09T03:00:11+5:30

The days of assuming the Maratha community are over now - Shahu Maharaj said | मराठा समाजाला गृहीत धरण्याचे दिवस आता संपले - शाहू महाराज यांनी ठणकावले 

मराठा समाजाला गृहीत धरण्याचे दिवस आता संपले - शाहू महाराज यांनी ठणकावले 

Next

विश्वास पाटील 
मुंबई : भारतीय संविधान अस्तित्वात आल्यानंतर आजवर प्रस्थापित राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला गृहीत धरून चालण्याचीच भूमिका बजावली; परंतु असे गृहीत धरून चालण्याचे दिवस आता संपले आहेत. सर्वच क्षेत्रांत होत असलेल्या पीछेहाटीमुळे समाजबांधव अस्वस्थ झाला आहे. समाजाचा आक्रोश रास्त आहे, म्हणूनच लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नोकरी व शिक्षण क्षेत्रातील आरक्षण देण्यासह मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाचे व्यापक धोरण जाहीर करा, अशी स्पष्ट मागणी कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
बुधवारी मुंबईत निघणाºया विराट मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क साधला असता शाहू महाराज म्हणाले, ‘आजपर्यंत मराठा समाजाने संपूर्ण राज्यात जिल्हानिहाय शांततेने मोर्चे काढले. या मोर्चातून मराठा समाजाचा आक्रोश पाहायला मिळाला. इतके होऊनही जर सरकार गांभीर्याने दखल घेणार नसेल, तर मराठा समाज आक्रमक बनेल. तोपर्यंत सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये. मराठे आता त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पेटून उठले आहेत.
राजर्षी शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांसह बहुजन समाजाला संस्थानच्या नोकºयांत पन्नास टक्के आरक्षण दिले. शिक्षणाची द्वारे सर्वांसाठी खुली केली. शाहू महाराजांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शाहूंचा हा विचार जसाच्या तसा अमलात आणला गेला नाही. तो अमलात आणणे आवश्यक होते. जर राजर्षी शाहू महाराजांची भूमिका जशीच्या तशी स्वीकारली असती, तर आज हे चित्रच दिसले नसते.
आजवर प्रस्थापित राज्यकर्त्यांनी या समाजाच्या उन्नती करता जेवढे लक्ष द्यायला पाहिजे होते तेवढे दिले नाही, म्हणूनच मराठा समाजाला गृहीत धरण्याचे दिवस आता संपले आहेत. राज्यकर्ते आपल्यासाठी काही करीत नाहीत, आपले प्रश्न आपणच सोडवू शकतो, ही भूमिका घेऊन आज मराठे लढत आहेत. पाणी गळ्यापर्यंत आले आहे, यापुढे हा समाज सहन करण्याच्या स्थितीत नाही. कायदे बदलून आरक्षण द्यावेच लागेल. तोपर्यंत मराठा समाजाचा राग शांत होणार नाही, असे शाहू महाराज यांनी बजावले.

आरक्षण देणार कसे..?
आरक्षण कसे देणार? हाही प्रश्न आहे. महाराष्टÑातील मराठा समजाला आरक्षण मिळेलही, पण राज्याबाहेरील मराठा समाजाचे काय? मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, ओडिसा, तामिळनाडू, गोवा, बिहार, पंजाब, दिल्ली आदी राज्यांतही मराठा समाज आहे. तिथल्या मराठ्यांची अवस्था फारच वाईट आहे, त्यांनाही न्याय मिळायला हवा.

फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिकेतून महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी मराठा समाजाच्या प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक करावी. यानिमित्ताने राज्य शासन सर्वसमावेशक व पुरोगामी असल्याचे सिद्ध करून दाखवावे, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रशासकीय सेवेत स्थान द्या
भारतीय लष्करात तसेच प्रशासकीय सेवेतील मराठा समाजाचे प्रमाण बेताचेच आहे, ते वाढवायचे असेल तर राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एन.डी.ए.), प्रशासकीय सेवा भरती सारख्या परीक्षांतही मराठ्यांना स्वतंत्र प्रर्वगात आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी शाहू महाराज यांनी केली.

Web Title: The days of assuming the Maratha community are over now - Shahu Maharaj said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.