महावितरणचा भोंगळ कारभार ? तुटलेल्या वीजेच्या तारांना चिटकून नवरा-बायकोचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 11:01 AM2017-08-12T11:01:54+5:302017-08-12T12:44:31+5:30
निंबळक-वाजेगाव येथे लाईटच्या तारेला चिकटून दोघा नवरा बायकोचा दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.
फलटण, दि. 12 - सातारा जिल्ह्यातील निंबळक-वाजेगाव येथे वीजेच्या तारेला चिकटून दोघा नवरा बायकोचा दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. दीपक रत्नसिंह मतकर (वय 35) व पत्नी योगिता दीपक मतकर (वय- 30) अशी मृतांची नावे आहेत. मतकर कुटुंबियांचे त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला एक एकर शेत आहे. सकाळी आठच्या सुमारास दीपक आणि त्यांची पत्नी योगिता जनावरांना चारा आणण्यासाठी शेताकडे चालले होते.
त्यावेळी त्या मार्गावरील वीजेच्या खांबाच्या तार तुटून खाली पडल्या होत्या. या तुटलेल्या तारांमधून विद्युत प्रवास सुरु होता. या तारांवर दीपक आणि योगिताचा पाय पडताच शॉक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दोघांचे चुलते तात्यासाहेब मतकर त्या दिशेने चालले असताना त्यांना दीपक आणि योगिता जमिनीवर निपचित पडलेले दिसले. लगेच त्यांनी त्या दिशेने धाव घेतली. आरडाओरडा करुन गावक-यांना गोळा करताना त्यांचा सुद्धा या तारांना स्पर्श झाला. त्यावेळी शॉक बसून ते फेकले गेले. सुदैवाने त्यांच्या प्रकृतीला धोका नाही.
जमलेल्या गावक-यांनी लगेच खांबावरील ट्रान्सफॉर्मरमधील फ्यूज काढून विद्युतप्रवाह बंद केला. दीपक आणि योगिताला जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दीपक आणि योगिताचे दुसरे चुलते भानुदास मतकर यांनी सकाळी सहाच्या सुमारास बरड येथील महावितरणच्या कार्यालयात फोन करुन वीजेच्या तारा तुटल्याची माहिती दिली होती. पण महावितरणकडून कोणतीही खबरदारीची पावले उचलण्यात आली नाही.
वेळीच कारवाई झाली असती तर, मतकर दांम्पत्याचे प्राण वाचले असते अशी गावक-यांमध्ये चर्चा आहे. या जोडप्याला दोन मुले असून, मुलगा दहाव्या इयत्तेत तर, मुलगी सातव्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. फलटणचे तहसीलदार विजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणात महावितरणच्या अधिका-यांनी हयगय केल्याचे सिद्ध झाले तर, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना सांगितले आहे अशी माहिती त्यांनी लोकमतशी बोलताना दिली.