सदाभाऊंच्या हकालपट्टीचा निर्णय योग्य - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 06:08 PM2017-08-07T18:08:21+5:302017-08-07T18:12:13+5:30
आज सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्याबाबतीत समितीने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.
कोल्हापूर, दि. 7 - गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष उघडपणे दिसून आहे. आज सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्याबाबतीत समितीने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.
राजू शेट्टी म्हणाले, सदाभाऊ खोत यांच्या संबंधी निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या समितीला पूर्ण अधिकार देण्यात आले होते. त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्याबाबतीत समितीने घेतलेला निर्णय योग्य आहे. या निर्णयामुळे शेतकरी संघटनेवर किंवा चळवळीवर कोणताही परिणाम होणार नाही. याचबरोबर येत्या आठ दिवसात कार्यकारिणीची बैठक आहे. आजच्या समितीने घेतलेल्या निर्णयावरुन आम्ही कार्यकारिणीच्या बैठकीत काय निर्णय घेऊ, हे तुम्हीच समजून घ्या. यापुढे राजू शेट्टी म्हणाले, सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद आणि आमदारकी दोन्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळेच मिळाले आहे. या दोन्ही गोष्टींचा निर्णय सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात येईल. याचबरोबर, राजू शेट्टी यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
सदाभाऊ खोतांची हकालपट्टी...
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे स्वाभिमानी संघटनेविरोधात भूमिका मांडत असल्याने त्यांना संघटनेत ठेवायचे की नाही, याबाबत निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीने सदाभाऊ खोत यांची चौकशी केल्यानंतर त्यांची आज संघटनेतून हकालपट्टी केली.
आरोपांमुळे संघटनेची बदनामी...
आजवर सदाभाऊ खोत यांनी केलेले काम लक्षात घेता आणि त्यांच्यावर गेल्या काही दिवसांत झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांची समितीने हकालपट्टीचा करण्याचा निर्णय घेतवा आहे. त्यांच्यावर होणा-या आरोपांमुळे संघटनेची बदनामी होत आहे, स्वाभिमानी सदस्य समितीचे दशरथ सावंत यांनी सांगितले.