शिवशाहीच्या अपघातात घट : एसटी महामंडळाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 15:52 IST2018-11-21T15:49:16+5:302018-11-21T15:52:36+5:30
शिवशाही बस सेवेत आल्यापासून अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या बसच्या सुरक्षित प्रवासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिवशाहीच्या अपघातात घट : एसटी महामंडळाचा दावा
पुणे : अपघाताच्या दुष्टचक्रात सापडलेल्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बससेवेला अच्छे दिन येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मागील दोन महिन्यांत शिवशाहीच्या अपघातांमध्ये घट तसेच उत्पन्नात देखील वाढ झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
वातानुकुलित व आरामदायी शिवशाही बस सेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ९९८ शिवशाही बसेस असून राज्यातील विविध २७८ मार्गावर दैनंदिन २१३० फेऱ्या करत होत आहे. मात्र, या बस सेवेत आल्यापासून अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या बसच्या सुरक्षित प्रवासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत विधीमंडळातही चर्चा झाली. त्यावर परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी अपघातांच्या कारणांचा शोध घेऊन उपाययोजना सुचविण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महामंडळाने समिती नियुक्त करून अपघातांच्या कारणांचे विश्लेषण करून उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यानुसार पुण्यातील महामंडळाच्या मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेत महामंडळाच्या चालक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकाºयांना थेट बसेस बनविणाºया कंपनीच्या तज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणामुळे अपघातांमध्ये घट झाली आहे. एप्रिल ते आॅगस्टदरम्यान दर एक लाख किलोमीटरमागे स्वमालकीच्या शिवशाही बसेसचे अपघाताचे प्रमाण ०. ४१ टक्के होते. सप्टेंबर महिन्यात त्यामध्ये ७ टक्क्यांनी घट झाली. आॅक्टोबरमध्ये हे प्रमाण ०.१८ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. तसेच खाजगी शिवशाही बसचे एप्रिल ते आॅगस्टदरम्यान दर एक लाख किलोमीटरमागे०.३४ टक्के अपघाताचे प्रमाण होते. सप्टेंबर २०१८ मध्ये ते ०.२८ टक्के तर आॅक्टोबर मध्ये ०.२१ टक्क्यांपर्यंत घटले. महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेसच्या अपघाताचे वार्षिक प्रमाण दर एक लाख किलोमीटर मागे ०.१८ टक्के आहे. त्यापेक्षा शिवशाही बसचे अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे महामंडळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.