कांद्याला भाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर, हमीभावाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 06:32 AM2018-12-02T06:32:57+5:302018-12-02T06:33:06+5:30
काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने शनिवारी टेहरे येथे शेतकरी रस्त्यावर उतरले.
मालेगाव (नाशिक) : काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने शनिवारी टेहरे येथे शेतकरी रस्त्यावर उतरले. कसमादे शेतकरी कृती समितीने महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. शेतकऱ्यांनी महामार्गावरच मुंडण केले, तसेच बैलगाडीतून कांदा आणून रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध केला.
सहा महिन्यांपेक्षा जास्त दिवस साठवणूक केलेल्या उन्हाळ कांद्याला मातीमोल भाव मिळाल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. साठवणुकीचा खर्चही वाया गेला आहे. बाजार समित्यांमध्ये कांद्याला किलोमागे केवळ एक रुपया ते पाच रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे नाराज शेतकरी कांद्याला हमीभावासाठी ठिकठिकाणी आंदोलने करीत आहेत.
निफाडमध्ये गुरुवारी संजय साठे यांच्या कांद्याला किलोमागे अवघा दीड रुपये भाव मिळाला. त्यामुळे संतापलेल्या साठे यांनी कांदा विक्रीतून आलेल्या १,०६४ रुपयांची मनीआॅर्डर थेट पंतप्रधान मोदी यांना केली होती. कांद्याचे पैसे पंतप्रधानांना पाठविणार असल्याचा बॅनरच त्यांनी ट्रॅक्टरवर लावला होता.