दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही फटाक्यांना बंदी घालावी, पर्यावरण मंत्री रामदास कदमांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 12:19 PM2017-10-10T12:19:34+5:302017-10-10T17:58:49+5:30
सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणली आहे, त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही फटाक्यांवर बंदी घालावी, अशी मागणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणली आहे, त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही फटाक्यांवर बंदी घालावी, अशी मागणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेणार असल्याचं रामदास कदम यांनी स्पष्ट केलं आहे.
पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले, फटाक्यांच्या कर्णकर्कश्श आवाजामुळे अनेक लोकांच्या कानांचे पडदे फाटतात, तसेच धुरामुळेसुद्धा वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. फटाक्यांमुळे कंपन्यांना आग लागल्याचे प्रकारही समोर आले आहेत. फटाके फोडण्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होतो.
हवेतील कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढून ओझोनच्या थरावरही याचा परिणाम होतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. रामदास कदम यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला असून, महाराष्ट्रात फटाक्यांविना दिवाळी साजरी करू या, असंही आवाहनही त्यांनी केलं आहे.
नवी दिल्ली व परिसरात सर्वोच्च न्यायालयाने 2016 सालचा फटाके विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय पुन्हा लागू करावा, यासाठी याचिका दाखल झाली होती. ए. के. सिकरी यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने 6 ऑक्टोबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने मागच्या वर्षी 11 नोव्हेंबरला एनसीआर भागात फटाकेविक्रीचे सर्व परवाने निलंबित केले होते.
यावर्षी 12 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने या बंदी संदर्भात नियम थोडे शिथिल केले होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने फटाकेविक्रीवर बंदी घालण्याला आपले समर्थन असल्याचे न्यायालयात सांगितले होते. दिवाळी आणि त्यानंतरच्या दिवसात वायू प्रदूषणामध्ये मोठी वाढ होते.
या मोसमात प्रदूषणात वाढ होण्यामागे विविध कारणे आहेत त्यात फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण हेसुद्धा एक कारण आहे, असा युक्तिवाद वकील गोपाळ शंकरनारायण यांनी केला होता. ते अर्जुन गोपाळ यांच्यावतीने युक्तिवाद करत होते. दिल्ली पोलिसांनी दुकानदारांना जारी केलेले फटाकेविक्रीचे परवानेही सर्वोच्च न्यायालयाने निलंबित केले होते.
रामदास कदमांच्या विधानाला संजय राऊतांचा आक्षेप
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रामदास कदमांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. फटाक्यांवर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे आणि फक्त भारतातच नाही तर जगात फटाके बनवले जातात. त्यामुळे फटाकेविक्री बंद करू नका, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.