डेमू लोकल प्रवाशांसाठी धोकादायक
By admin | Published: July 8, 2017 02:12 AM2017-07-08T02:12:40+5:302017-07-08T02:12:40+5:30
दौंड-पुणेदरम्यान धावणारी डेमू लोकल दिवसेंदिवस धोकादायक आणि बेभरवशाची होत चालली असून या धोकादायक लोकलला
लोकमत न्यूज नेटवर्क
दौंड : दौंड-पुणेदरम्यान धावणारी डेमू लोकल दिवसेंदिवस धोकादायक आणि बेभरवशाची होत चालली असून या धोकादायक लोकलला पाटस (ता. दौंड) येथील रेल्वे स्थानकाच्या औटरला आग लागता लागता वाचली.
दैव बलवत्तर होते म्हणून प्रवासी वाचले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. दौंड रेल्वे स्थानक सोडल्यानंतर डेमू लोकलच्या एका बोगीच्या चाकाला घर्षण सुरू झाले. पाटस स्टेशनजवळ लोकल आली तेव्हा चाकाच्या ब्रेकलायनरमधून धूर यायला सुरू झाला. धुराचे लोळ सर्वत्र पसरल्याने डेमूला आग लागल्याची बातमी प्रवाशांत पसरली. प्रवाशांत एकच धावपळ सुरू झाली. डेमूच्या डब्यातून प्रवाशांनी चेन ओढून लोकल थांबविण्याचा प्रयत्न केला; परंतु लोकल थांबली नाही. रेल्वेगेटमनला चाकातून धूर येताना दिसला, तेव्हा गेटमनने वॉकीटॉकीच्या साह्याने इंजिनचालकाला कळविल्यावर लोकल थांबली. लोकल थांबल्यानंतर काही प्रवाशांनी गाडीतून खाली उड्या मारल्या, तर काही डब्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली. डेमूला आग लागली नसून चाकातून धूर निघत आहे, असे प्रवाशांना समजताच प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. काही प्रवासी व रेल्वे अधिकाऱ्यांनी धूर निघत असलेल्या चाकावर पाणी मारले. त्यानंतर काही वेळाने डेमू पाटस रेल्वेस्थानकात आली.
धूर आणि आगीची तिसरी घटना
दौंड - पुणे डेमू लोकल २५ मार्चला सुरू झाली. गेल्या सहा महिन्यांत या गाडीच्या चाकाला मांजरी परिसरात आग लागली होती, तर पाटस रेल्वे स्थानकाच्या जवळपास दोनदा चाकातून धूर निघाल्याची घटना घडली आहे, तसेच दोन ते तीन वेळेस डेमूच्या इंजिनात बिघाड झाल्याने डेमू बंद पडली होती. अन्य इंजिन लावून या लोकलला दे धक्का करण्यात आले. परिणामी डेमू लोकल प्रवाशांसाठी धोकादायक असल्याची भीती प्रवाशांत आजही कायम आहे.
रेल्वे प्रशासनाची हुकूमशाही ?
दौड रेल्वेचे बहुतांशी प्रश्न रेल्वे अधिकाऱ्यांच्या मुजोरीमुळे प्रलंबित आहे. परिणामी जवळजवळ रेल्वे अधिकाऱ्यांची हुकूमशाही झाली असल्याचे बोलले जाते. दौंड ते पुणेदरम्यानची वाढती प्रवाशांची संख्या पाहता दौड रेल्वे स्थानकातून सकाळी सात वाजता सुटणारी डेमू लोकल गैरसोईची आहे, तेव्हा सकाळी डेमूऐवजी जुनी शटल गाडी सोडावी, अशी मागणी आहे. डेमूऐवजी जुनी शटल गाडी तातडीने सोडली जाईल, असे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात खासदार सुप्रिया सुळे यांना दिले होते. परंतु अद्याप जुनी शटल गाडी सुरू नाही. त्यामुळे प्रवाशांची हेंडसाळ सुरू आहे, मात्र रेल्वे अधिकाऱ्यांची मनमानी कायम आहे.
डेमू इतर वेळेला असावी
सकाळी दौंड ते पुणे आणि सायंकाळी पुणे ते दौंड प्रवाशांची गर्दी असते तेव्हा याव्यतिरिक्त डेमू लोकलसेवा सुरू असावी, कारण दुपारच्या वेळेला प्रवाशांची गर्दी कमी असते. परिणामी प्रवाशांची गैरसोय होणार नाही परंतु वेळोवेळी डेमूच्या चाकातून धूर निघणार नाही, तसेच प्रवाशांची सुरक्षितता याची काळजी रेल्वे प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.
डेमूतील जुगार आणि हाणामारी
डेमूच्या डब्यांमध्ये प्रवाशांना बसण्याची गैरसोय आहे. परिणामी प्रवाशांना खाली बसावे लागते काही प्रवासी खास जुगार खेळण्यासाठी प्रवास करतात.
पुढच्या स्टेशनवर बसणाऱ्या जुगारी मित्रांसाठी जागा धरतात यातूनच प्रवाशांबरोबर जुगारी भांडणे करतात. अर्वाच्च भाषा वापरतात, हे सातत्याने घडत असते.
शुक्रवारी (दि. ७) सकाळी डेमूला आग लागल्याच्या अफवेतून प्रवाशांना दिलासा मिळतो ना मिळतो तोच उरुळी ते लोणीच्या दरम्यान बसण्याच्या जागेवरून काही प्रवाशांत जोरदार शाब्दिक चकमकी झाल्या.
डेमूमधील काही जुगारी प्रवाशांच्या गुंडगिरीबाबत दौंड येथे झालेल्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रश्न उपस्थित झाल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत नाराजी व्यक्त करून जुगाऱ्यांचा बंदोबस्त तातडीने करावा, अशा सूचना रेल्वे पोलिसांना दिल्या होत्या, मात्र यात कुठलाही बदल झाला नसून जुगाऱ्यांची दादागिरी अद्याप सुरू आहे.