अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्तांची बदली
By admin | Published: June 29, 2017 02:07 AM2017-06-29T02:07:01+5:302017-06-29T02:07:01+5:30
अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्या बदलीनंतर आता मंत्री गिरीश बापट यांनी या विभागात वर्षानुवर्षे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्या बदलीनंतर आता मंत्री गिरीश बापट यांनी या विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अत्यंत प्रभावी अशा दोन्ही सहआयुक्तांना मुंबईबाहेर काढले आहे. सहआयुक्त ओ. शो. साधवानी यांची नाशिकला, तर सु.गं. अन्नपुरे यांची अमरावतीला रवानगी करण्यात आली आहे.
औषध विभागाचे सहआयुक्त ओ.शो. साधवानी यांची एकूण नोकरी २७ वर्षे झाली असून २२ वर्षे ते ठाणे, रायगड आणि मुंबईतच कार्यरत होते. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी विविध पदे सांभाळणारे साधवानी विभागाचे बडे प्रस्थ मानले जातात. लोकमतने ‘आरोग्यम ‘धन’संपदा’ या वृत्तमालिकेत या अधिकाऱ्यांवर प्रकाश टाकला होता. अन्नपुरे यांच्या बदलीचे आदेश १४ जून रोजी निघाले. तात्काळ कार्यमुक्त करावे असे लेखी सांगण्यात आले तरी अद्याप अन्नपुरे यांना नवीन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी कार्यमुक्त केलेले नाही. अन्नपुरे यांच्या जागी नवीन अधिकारी द्यावेत, अशी मागणी आम्ही केली आहे; पण ते अद्याप मिळालेले नाहीत. ते मिळाले की त्यांना कार्यमुक्त केले जाईल, असे आयुक्त डॉ. दराडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दीर्घकाळ मुंबई, ठाण्यातच ठाण मांडून बसलेल्या व ज्यांच्या एकूण सेवेपैकी ८० टक्के नोकरी फक्त पुणे, मुंबई आणि ठाण्यातच झाली अशांच्या बदल्या करण्याची शिफारशी तत्कालिक आयुक्त महेश झगडे यांच्या लोकमत चौकशी समितीने केली होती. ती शिफारशी स्वीकारली, पण त्यावर अंमलबजावणी होत नव्हती. लोकमतने हा विषय सातत्याने लावून धरला होता. अखेर मंत्री बापट यांनी या दोन्ही बड्या अधिकाऱ्याची बदली केली आहे.
साधवानी यांच्याकडे विधी आयुक्तांचाही पदभार होता. एकाच अधिकाऱ्याकडे मुख्यालयातील ही महत्वाची कामे दीर्घ काळ कोणामुळे व कशी आली हा संशोधनाचा विषय आहे. दोन्ही विभाग एकाच व्यक्तीकडे असल्याने डब्ल्यूएचओच्या फाईली तेथे देणे अत्यंत धोक्याचे असल्याचे निरीक्षक दक्षता विभागाचे सहसंचालक हरिष बैजल यांनी लेखी दिले होते. बैजल अडचणीचे ठरतात हे लक्षात आल्यानंतर या विभागातील अधिकाऱ्यांच्या टोळीने बैजल यांचीच बदली घडवून आणली होती.
सगळ्यांनाच हवे मुंबई, ठाणे !
मुंबई, ठाणे, पुणे आणि फारतर रायगड हे जिल्हे कोणालाही सोडायचे नाहीत. सहाय्यक आयुक्त विनिता थॉमस यांची सेवा २५ वर्षे झाली. त्यातली २३ वर्षे त्या ठाणे, मुंबईबाहेर गेलेल्या नाहीत. सहाय्यक आयुक्त नि. मो. गांधी २३ वर्षातले १५ वर्षाहून अधिक काळ मुंबईत आहेत. श्रीमती ह.मा. आहाळे एकूण सेवेच्या २३ वर्षापैकी २० वर्षे पुण्यासह ठाणे, मुंबई या तीन जिल्ह्यात कार्यरत आहेत.
डॉ. रा. ना. तिरपुडे हे २४ वर्षापैकी १७ वर्षे याच भागात आहेत. श्रीमती प्रे. प्र. म्हानवर यांची सेवा २३ वर्षे झाली. त्यातले १६ महिने त्या गडचिरोलीला आणि फक्त १५ दिवस सांगलीला होत्या. उर्वरित २० वर्षाहून अधिकचा काळ त्या याच भागात आहेत. प्र. ब. मुंदडा यांची लाच मागितल्याप्रकरणी आणि अन्य एका प्रकरणात विभागीय चौकशी सुरु आहे; तरीही हे गृहस्थ २४ वर्षातील दहा वर्षाहून अधिक काळ याच भागात आहेत. ही यादी तब्बल ५० ते ६० अधिकाऱ्यांची आहे. यावर आता बापट काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे.
आम्ही बदल्यांचे आदेश काढले आहेत. प्रशासनाचे त्याचे पालन केले पाहिजे. कोणत्याही व्यक्तीमुळे काम अडायला नको. अन्य अधिकाऱ्यांकडे पदभार देऊन काम चालू ठेवता येते. प्रशासन हे व्यवस्थेवर चालते व्यक्तींवर नाही. त्यामुळे सरकारच्या आदेशाचे पालन आणि सन्मान झाला पाहिजे. वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्यांनाही लवकरच बदलले जाणार आहे.
- गिरीष बापट,
अन्न व औषधी प्रशासन मंत्री.