सैन्यदलाविषयी समाजाचे औदासिन्य खेदजनक - अनुराधा गोरे
By admin | Published: May 14, 2017 01:42 AM2017-05-14T01:42:17+5:302017-05-14T01:42:17+5:30
आपले सैन्य दल गेली अनेक वर्ष उत्तम कामगिरी करत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आपले सैन्य दल गेली अनेक वर्ष उत्तम कामगिरी करत आहे. मात्र सैन्यदलाविषयी समाजात असणाऱ्या उदासिनतेविषयी अत्यंत खेदजनक भावना असल्याचे प्रतिपादन लक्ष फाऊंडेशनच्या संस्थापिका आणि वीरमाता अनुराधा गोरे यांनी केले. अनुराधा गोरे लिखित आणि ग्रंथाली प्रकाशित ‘कथा परमवीरचक्र विजेत्यांच्या आणि आॅपरेशन सद्भावना’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ््यात बोलत होत्या.
विलेपार्ले येथील घैसास सभागृहात पार पडलेल्या या सोहळ््यात गोरे यांनी ‘आॅपरेशन सद्भावना’ विषयी सांगितले की, परमवीर चक्र विजेते ‘कसं मरावं’ ते सांगतात तर सैन्य दलातील जवान ‘जगावं कसं’ ते दाखवून देतात. विनायक गोरे या आपल्या पुत्राच्या हौताम्यानंतर आलेल्या उदासीनतेवर मात करत गोरे या २०-२२ वर्ष सैन्यदलाविषयी जागृकता निर्माण करण्याचे कार्य करीत आहेत.
यावेळी, अलका गोडबोले यांनी १९६२ च्या चीनबरोबरच्या अपयशी युद्धातील प्रत्येक जण शूर होता. आणि या प्रत्येकाची कथा ही ‘युद्धस्य रम्या कथा’ नाही तर धगधगते निखारे आहेत. या पुस्तकाचे वैशिष्ट्य सांगताना त्या म्हणाल्या की, १९४७-४८ च्या भारत-पाक युद्धापासून ते १९८७-९० चे ‘आॅपरेशन पवन’ या सर्वसामान्यांना अपरिचित असलेल्या युद्धांचा, त्यातील वीरांचा परिचय पुस्तकात करुन दिला आहे.
याप्रसंगी, उपस्थित प्रमुख पाहुणे नागालँडचे राज्यपाल पद्मनाभजी आचार्य यांनी आपल्या मनोगातात ईशान्येकडील सर्व राज्यात वीज, शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रांच्या माध्यमातून कशी प्रगती होऊ शकेल याचा आढावा घेतला. या राज्यातील माणसांकडे स्वातंत्र्यानंतर कोणी लक्ष दिले नाही, त्यामुळे येथील माणसे बंडखोर झाल्याचे त्यांनी नमूद केले.