युतीचा 'नगारा' वाजला!; मुख्यमंत्री व उद्धव ठाकरेंनी एकमेकांवर उधळली स्तुतिसुमने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 07:28 PM2018-12-03T19:28:45+5:302018-12-04T07:05:50+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळून संत सेवालाल महाराजांच्या पवित्र भूमित नगारा वाजविला, त्यामुळे भाजपा-सेना युतीचा नगारा वाजल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
- जगदीश राठोड
पोहरादेवी : भाजपा-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाल्यापासून या दोन पक्षात एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सातत्याने झाला. त्यामधूनच दोन्ही पक्षांनी स्वबळाची भाषा केली; मात्र गेल्या महिनाभरापासून भाजपा-शिवसेनेचे संबंध मधूर होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. सोमवारी वाशिममधील पोहरादेवी येथे त्याचे पुन्हा प्रत्यंतर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळून संत सेवालाल महाराजांच्या पवित्र भूमित नगारा वाजविला, त्यामुळे भाजपा-सेना युतीचा नगारा वाजल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे नगारारूपी वास्तूसंग्रहालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री संजय राठोड, सहपालकमंत्री मदन येरावार, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह संत रामराव महाराज या मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही नगारा वाजवून केल्याने ते कार्य चांगले व यशस्वी होते, असा प्रघात बंजारा समाजात आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांसह शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंजारा समाजाचं पारंपरिक वाद्य नगाºयाचं वादन केलं. एवढेच नव्हे तर यानंतर झालेल्या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली. राज्य चालविणे सोपी गोष्ट नाही, याची जाणीव मला आहे; मात्र तुम्ही उत्तम चालवित आहात, गेल्याच आठवड्यात आपण मराठा समाज बांधवांना आरक्षण दिले, त्याबद्दल तुमचे अभिनंदन, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. मराठा समाजाची मागणी मान्य केली, आता माझा बंजारा समाज आहे, धनगर समाज आहे, यांच्याही मागण्याकडे लक्ष द्या, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांच्यासाठी कार्यक्रम स्थळी येताना प्रोटोकॉलला बगल देत उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून कार्यक्रमस्थळ गाठले होते. उद्धव यांनी केलेल्या स्तुतीचा आदरपूर्वक स्वीकार करीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव हे आमचे मार्गदर्शक आहेत, असे सांगितले. उद्धवजीसुद्धा या मंचावर आहेत अर्थात संपूर्ण राज्य सरकारच आज पोहरादेवीत आहे, त्यामुळे येथील विकासाचे प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांनी एकमेकांचे कौतुक करून मैत्रीचा सेतु भक्कम केला. राज्यासोबतच वाशिम लोकसभा मतदारसंघात भाजपा-सेनेमध्ये ताणलेले संबंध सोमवारच्या कार्यक्रमाने मैत्रीत परावर्तीत झाल्याने पोहरादेवीत वाजलेले नगारे हे युतीचेच, अशी चर्चा यावेळी सुरू झाली.
उद्धव यांनी काढली आजोबांची आठवण
संत सेवालाल महाराजांनी चांगल्या वैचारिक शिकवणीसह लढाऊ वृत्तीचे दर्शन घडविले. स्वाभिमानाने जगा लाचार होऊ नका ही त्यांचीच शिकवण. याच शिकवणीचा वारसा मला आजोबांपासून मिळाला आहे. आमच्या आजोबांनी टांग्याचे नंबर रंगविले मात्र भीक मागीतली नाही. स्वाभिमान शिकविला त्यामुळे संत सेवालाल महाराजाचाच वारसा आम्ही सारे चालवित आहोत असे उद्ध्व ठाकरे म्हणाले.