रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 11:54 PM2024-05-05T23:54:46+5:302024-05-05T23:55:38+5:30

माझं चित्र रेखाटण्याऐवजी रक्तदान करा -देवेंद्र फडणवीसांचा तरुणाला सल्ला.

devendra Fadnavis first praised the artist who drew his picture with blood and then gave advice | रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!

रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!

Devendra Fadnavis ( Marathi News ) : राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रमुख नेत्यांच्या सभांचाही सपाटा सुरू असल्याचं पाहायला मिळतं. सभांच्या निमित्ताने नेता आपल्या परिसरात आल्यानंतर त्यांचे चाहते विविध कृतींद्वारे नेत्याप्रती आपले प्रेम व्यक्त करतात. भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनाही पंढरपूरमधील सभेवेळी असाच एक चाहता भेटल्या. फडणवीसांच्या या चाहत्याने त्यांना चक्क आपल्या रक्ताने रेखाटलेले चित्र भेट म्हणून दिले. या प्रेमाने भारावलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला या तरुणाचे आभार मानले आणि नंतर त्याला असे चित्र रेखाटण्याऐवजी रक्तदान करावे, असा प्रेमळ सल्लाही दिला.

पंढरपूरमध्ये आलेला अनुभव आपल्या एक्स हँडलवर शेअर करताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, "पंढरपूरचा पियुष शैलजा गिरीश हत्तीगोटे याने स्वत:च्या रक्ताने रेखाटलेले चित्र मला आज पंढरपूरच्या दौर्‍यादरम्यान भेट दिले. मी त्याचा मन:पूर्वक आभारी आहे. पियुष तू भेट दिलेले चित्र अतिशय उत्तम, यात वाद नाहीच. कला म्हणून मी त्याचा सन्मानच करतो. पण, माझी यानिमित्ताने एक विनंती सर्वांना आहे, तुमचे रक्त माझे चित्र काढण्यासाठी सांडण्यापेक्षा, मोठ्या प्रमाणात रक्तदान करा. त्यातून अनेकांची आयुष्य वाचवण्याच्या कामी हातभार लागेल. आपले रक्त समाजासाठी अर्पित करणे, हीच आपली संस्कृती आहे आणि त्याच मार्गाने आपल्याला वाटचाल करायची आहे," असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, माझ्यावर दाखवलेल्या या प्रेमाबद्दल पियुषचे खूप खूप आभार, असंही फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.

Web Title: devendra Fadnavis first praised the artist who drew his picture with blood and then gave advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.