निजामाचा बाप म्हणणा-यांसोबत युती नको- मधू चव्हाण
By admin | Published: June 19, 2016 05:32 PM2016-06-19T17:32:23+5:302016-06-19T17:42:34+5:30
भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सेनेशी युती करण्यावरून भाजप नेत्यांमधली दुफळी समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 19- भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सेनेशी युती करण्यावरून भाजप नेत्यांमधली दुफळी समोर आली आहे. निजामाचा बाप म्हणणा-यांसोबत युती करू नये, अशी आक्रमक भूमिका भाजप नेते मधू चव्हाण यांनी मांडली. मात्र त्याच वेळी केंद्रातील नितीन गडकरी आणि वेंकय्या नायडूंनी शिवसेनेसोबत युती करण्याचा सूचक सल्ला दिला आहे. नायडूंनी भाजप नेत्यांना यावेळी शिवसेना हा आपला जुना मित्र पक्ष असल्याची जाणीव आवर्जून करून दिली आहे.
या कार्यकारिणीच्या बैठकीत नितीन गडकरी, वेंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, मधू चव्हाण, विनोद तावडे या नेत्यांसह इतरही नेते उपस्थित होते. विनोद तावडे यांनी शिवसेनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कार्यकारिणीच्या बैठकीत अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यानंतर आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेशी युती ठेवायची की नाही, यावर चर्चा सुरू झाली. या चर्चेवेळी भाजप नेत्यांमधली दुफळी समोर आली.
यावेळी मधू चव्हाण यांनी शिवसेनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. निजामाचा बाप म्हणणाऱ्यांसोबत युती ठेऊ नका, असे मत त्यांनी मांडले. भाजपने स्वतंत्र निवडणुका लढवाव्यात, आमच्या मनगटात तेवढे बळ आहे, असं म्हणत शिवसेनेशी युती न करण्याचा इशारा मधू चव्हाणांनी दिला आहे. मधू चव्हाणांच्या भूमिकेलाही कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.