आयुष्यात कितीही संकटे आली तरी हार नही मानूंगी ! - पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 02:09 AM2017-10-01T02:09:00+5:302017-10-01T02:09:17+5:30
आयुष्यात कितीही संकटे आली तरी ‘हार नही मानूंगी...अशा शब्दात महिला विकास व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
- सतीश जोशी, अनिल गायकवाड ।
सावरगावघाट (जि. बीड) : दस-याच्या निमित्ताने माझ्या गरीब समाजबांधवांशी संवाद साधण्याची संधी नाकारली गेली. कर्मभूमीने जरी नाकारले असले तरी भगवानबाबांच्या पवित्र जन्मभूमीने बोलाविल्यामुळे मी समाजासाठी येथे आले आहे असे सांगत आयुष्यात कितीही संकटे आली तरी ‘हार नही मानूंगी...अशा शब्दात महिला विकास व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
बीड जिल्ह्यातील संत भगवानबाबांचे जन्मस्थळ श्री क्षेत्र सावरगावघाट (ता. पोटोदा)येथे शनिवारी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी जमलेल्या समाजबांधवांसमोर नतमस्तक होत पंकजा यांनी मला राज्यात कुठेच भाषण बंदी नाही आणि गडावरच कशी, असा प्रश्न उपस्थित केला. भगवानबाबांचे भक्त या नात्याने स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर समाजातील गोरगरीबांची सेवा केली. जमेल तशी काळजी घेतली. मीदेखील हाच वारसा पुढे चालवित असून त्यासाठीच आज तुमच्यापुढे उभी आहे, असेही त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांचा निर्णय योग्य - नामदेव शास्त्री
पाथर्डी (जि. अहमदनगर) : पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळावा न घेण्याविषयी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असून, त्याचे स्वागत करतो. परंतु त्यासाठी त्यांनी जो वाद घातला तो टाळला असता, तर अधिक बरे झाले असते, असे मत भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी व्यक्त केले. यापुढील काळात त्यांनी ‘त्या’ ठिकाणीच मेळावा घ्यावा, असेही ते म्हणाले.
भगवानगडावरील गर्दीला ओहोटी
पाथर्डी (जि. अहमदनगर) : पंचवीस वर्षांपासून भगवानगडावर होणाºया दसरा मेळाव्याची परंपरा यंदा प्रथमच खंडित झाली. भगवानगडावरील गर्दी कमी असली, तरी हजारो भाविकांनी आले हाते़
सावरगावातच होणार दसरा मेळावा
येथून पुढे कायम येथे दसरा मेळावा होईल. नवी परंपरा सुरु होईल. मी कधीही तुम्हाला अंतर देणार नाही. ही कट कारस्थाने कुणी केली, त्याला काळ उत्तर देईल.
- पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री