डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: बिबी का मकबऱ्यामागे अंदुरेने केली पिस्तूल चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 01:40 AM2018-09-14T01:40:27+5:302018-09-14T06:30:50+5:30
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी आणि हत्येच्या दिवशी सचिन अंदुरे हा कामाच्या ठिकाणी गैरहजर होता.
- बापू सोळुंके
औरंगाबाद : अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनासाठी मिळालेले पिस्तूल काम करते अथवा नाही, हे पाहण्यासाठी मारेकरी सचिन अंदुरेने येथील जगप्रसिद्ध बिबी का मकबऱ्यामागील निर्जनस्थळी चाचणी केल्याचे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले आहे. शरद कळसकरने शूलिभंजन परिसरातील जंगलात आणि पांगारकरच्या मदतीने जालन्यातील फार्म हाऊसवर पिस्तुलाचा सराव केल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी आणि हत्येच्या दिवशी सचिन अंदुरे हा कामाच्या ठिकाणी गैरहजर होता. त्याबाबतचे त्याचे कार्यालयातील रजिस्टरही सीबीआयने जप्त केले आहे. त्याला या हत्येसाठी जालना येथील माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरने शस्त्र पुरविले होते. त्याच्या फार्म हाऊसवर पिस्तूल चालविण्याचा सरावही केला होता. त्यानंतर सचिनने १९ आॅगस्टला रात्री बीबीका मकबऱ्यामागील जंगलात पिस्तुलाची चाचणी केली होती. ते ठिकाणही त्याने काही दिवसांपूर्वी एटीएस पथकाला दाखविले.