डॉ. दाभोलकर हत्याप्रकरण: अंदुरे-तावडेने रचला कट; सीबीआयचा कोर्टात दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:55 AM2018-08-20T00:55:24+5:302018-08-20T06:47:50+5:30
महाराष्ट्र, कर्नाटकात घेतले पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण; २६ आॅगस्टपर्यंत कोठडी
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये सचिन अंदुरे याचा समावेश असून त्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात पिस्तुल चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते, असे तपासात पुढे आले आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याबरोबर अंदुरेने हत्येचा कट रचला होता, असा दावा सीबीआयने जिल्हा सत्र न्यायालयात रविवारी केला. हत्येचा सखोल तपास करून सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी अंदुरेला कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी त्याला २६ आॅगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
नालासोपारा येथे स्फोटके जप्त केल्यानंतर वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयच्या पथकाने डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित हल्लेखोर अंदुरेला शनिवारी अटक केली होती. सीबीआयचे विशेष सरकारी वकील अॅड. विजयकुमार ढाकणे युक्तीवादात म्हणाले, दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केलेल्या अंदुरेला पिस्तुल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षण कोणी दिले? हत्येसाठी आवश्यक बाबी त्याला कोणी पुरविल्या? हत्येसाठी वापरलेले वाहन व शस्त्र जप्त करण्यासाठी व सखोल तपासासाठी त्याला चौदा दिवसांची कोठडी देण्यात यावी.
बचाव पक्षाकडून अॅड. प्रशांत साळशिंगीकर यांनी बाजू मांडली. दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला अटक झाली होती. तेव्हा सीबीआयकडून दाखल केलेल्या दोषारोप पत्रात सारंग अकोलकर, विनय पवार यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या केल्याचे नमूद केले होते. अकोलकर आणि पवार हे दोघे फरार असून त्यांचे रेखाचित्र देखील जारी करण्यात आले आहे. दोषारोपपत्रात अंदुरेचा उल्लेखही नव्हता.
शस्त्र व गाडी यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. बंदुकीबाबत मनीष नागोरी व विकास खंडेलवाल यांना अटक केली होती. त्यामुळे आता अंदुरेला अचानक अटक का करण्यात आली? १४ आॅगस्टला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने अंदुरेला चौकशीसाठी बोलाविले होते.
चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले होते. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने अंदुरेला चौकशीसाठी बोलाविले आणि अटक केली. त्याचा या गुन्ह्यात काहीच सहभाग नसून खोटे आरोप करून त्याला गोवण्यात येत आहे, असा आरोप अॅड. साळशिंगीकर यांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने अंदुरेला सीबीआय कोठडी सुनावली.
आज पाचवा स्मृतिदिन
डॉ. दाभोलकरांच्या हत्येला सोमवारी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. पाचव्या स्मृतिदिनी विचारांचा जागर करण्यात येणार आहे. पुण्यातील साने गुरुजी स्मारक येथील कार्यक्रमात अभिनेते प्रकाश राज आणि दिग्दर्शक अमोल पालेकर सहभागी होणार आहेत. सकाळी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गीतांमधून अभिवादन करण्यात येईल. पूलापासून साने गुरुजी स्मारकापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येईल. ११ वाजता ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे चर्चासत्र होणार असून त्यात मेघा पानसरे, कविता लंकेश, श्रीविजय कलबुर्गी, मुक्ता दाभोलकर आणि तुषार गांधी सहभागी होणार आहेत.
अंदुरेने झाडली तिसरी गोळी?
अंदुरे मोटारसायकल चालवित होता, त्याचा साथीदार पाठीमागे बसला होता. साथीदाराने डॉ. दाभोलकरांवर दोन गोळ््या झाडल्या तर तिसरी गोळी अंदुरेने झाडल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे दोन्ही आरोपींकडे पिस्तुल होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माझा पती निर्दोष; सीबीआयने फसवले
माझा पती निर्दोष आहे, त्यांना फसवण्यात आले आहे. एटीएसने त्यांना औरंगाबादला घरी आणून सोडल्यानंतर सीबीआयने चौकशी करतो म्हणून नेले आणि अडकवले, असा आरोप सचिनची पत्नी शीतल यांनी केला आहे.