भयाण वास्तव : ‘ मतपेटी’ ची ने-आण करण्यासाठीच ‘या ’ गावात येते एसटी बस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 04:57 PM2019-04-17T16:57:12+5:302019-04-17T16:57:53+5:30
इंदापूर तालुक्यातील हे एक भयाण वास्तव...देशाला स्वातंत्र्य मिळून आता तब्बल ७२ वर्ष उलटून गेली आहेत. मात्र,
इंदापूर (कळस) : देशाला स्वातंत्र्य मिळून आता तब्बल ७२ वर्ष उलटून गेली आहेत. मात्र, इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी या ग्रामीण डोंगर भागात आजही एसटी बस पोहचलेली नाही. केवळ मतपेटी ने आण करण्यासाठीच या गावात एसटी बस येते.सरकार कितीही बदलले तरी ग्रामीण भाग अजूनही विकासाच्या प्रतिक्षेत आहे. या गावात अद्यापपर्यंत मूलभूत सुविधाच पोहोचल्या नाहीत. या गावात जाण्यासाठी संपूर्ण रस्त्यावर केवळ माती आणि दगडच दिसत आहे.
कडबनवाडी हजार ते अकराशे लोकसंख्येचे गाव. या गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याचे समोर आले आहे. येथे काही वर्षांपूर्वी या ठिकाणी एक साधा रस्ता होता, मात्र त्यानंतर आतापर्यंत एकदाही या रस्त्याची डागडुजी झाली नाही. तसेच आतापर्यंत एकाही योजनेच्या माध्यमातून या रस्त्याचे काम झाले नाही. प्रशासनाच्या या उदासिनतेचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. रस्ताच नसल्यामुळे या गावात रस्ता तिथे एसटी हे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस या ठिकाणी पोहचली नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संपवून पुढील शिक्षणासाठी तालुक्याला जाणाºया विद्यार्थ्यांचेही पायपीटीने प्रचंड हाल होतात. पावसाळ्यात तर या रस्त्याने पायी चालणे ही कठीण होते. या रस्त्याची साधी डागडुजीही झाली नाही. रात्री - अपरात्री या ठिकाणी एखाद्या आजारी रुग्णला दवाखान्यात न्यायचे असल्यास प्रचंड हाल होतात. यामुळे गावकºयांना प्रचंड त्रास होत आहे
आज देश विकासाची स्वप्न पाहत आहे. मात्र ,येथील नागरिक परिवहन मंडळाच्य लाल परीला गावात पाहण्यात उत्सुक्त आहेत. गावच्या विकासाच्या दृष्टीने दळणवळणाच्या सोयी उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. गावाचा विकास हा खुंटला आहे. यामुळे विद्यार्थी तसेच शेतकरी मजूर आणि ग्रामस्थ यांना त्रास होत आहे. .जलसंधारणाच्या माध्यमातून गावाने चळवळ निर्माण केली .मात्र ,तरीही विकास हा कोसो दुरच राहिला आहे.
——————————————
अवर्षणप्रवण आमच्या गावाला आजही पक्का रस्ता नाही . गावात अजूनही मतदान मतपेटी ने -आण वगळता एसटी बसच आली नाही .रस्त्याचे काम अनेक वेळा सुरू केले व बंदही झाले . आजही गावाला रस्ता नाही. तानाजी शिंगाडे , ग्रामस्थ
———————————