भेंडी बाजार दुर्घटना : ११७ वर्षे जुनी 6 मजली इमारत कोसळली, उदासीन व्यवस्थेचे पुन्हा 33 बळी, बचावकार्य पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 05:36 AM2017-09-01T05:36:11+5:302017-09-01T11:32:28+5:30

मुसळधार पावसाच्या तडाख्यानंतर गुरुवारी मुंबईतील भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील ११७ वर्षे जुनी सहा मजली हुसैनी इमारत गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पत्त्यासारखी कोसळल्याने 33 जणांना जीव गमवावा लागला

 Due to the depressed system, 24 victims and 30-year-old men stuck under the 117-year-old six-storey building | भेंडी बाजार दुर्घटना : ११७ वर्षे जुनी 6 मजली इमारत कोसळली, उदासीन व्यवस्थेचे पुन्हा 33 बळी, बचावकार्य पूर्ण

भेंडी बाजार दुर्घटना : ११७ वर्षे जुनी 6 मजली इमारत कोसळली, उदासीन व्यवस्थेचे पुन्हा 33 बळी, बचावकार्य पूर्ण

Next

मुंबई : मुसळधार पावसाच्या तडाख्यानंतर गुरुवारी मुंबईतील भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील ११७ वर्षे जुनी सहा मजली हुसैनी इमारत गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पत्त्यासारखी कोसळल्याने 33 जणांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेत बचावकार्य करणा-या ६ कर्मचा-यांसह १९ जण जखमी झाले. उदासीन व्यवस्थेचे ते बळी ठरले. बचावकार्य पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एनडीआरएफकडून रात्रभर बचावकार्य सुरु होते. या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नसून दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

इमारतीत तळ मजल्यावर लहान मुलांची नर्सरी शाळा, पहिल्या मजल्यावर चार खोल्या तर इतर माळ्यांवर प्रत्येकी एक प्रमाणे एकूण दहा खोल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीत नऊ कुटुंब राहत असून, ६० ते ७० लोक होते. इमारत दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव शेजारच्या दोन इमारतींमधील कुटुंबांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद पथकाचे जवान आणि अन्य यंत्रणेने जिकिरीचे प्रयत्न करीत जखमींना सुखरूप बाहेर काढले. म्हाडाने २०११मध्येच ही इमारत धोकादायक घोषित केली होती. त्यानंतर ‘सैफी बुºहाणी अपलिफमेंट ट्रस्ट रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट’मध्ये होती. २०१६मध्ये इमारत पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र रहिवाशांनी घराबाहेर पडण्यास नकार दिला होता.

धोकादायक इमारती सक्तीने रिकाम्या करणार
इमारत कोसळल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. धोकादायक इमारतीत राहणाºया लोकांना जबरदस्तीने बाहेर काढले जाईल. आता सरकार थांबणार नाही. आठवड्याभरात ही कारवाई करण्यात येईल, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी माध्यमांना सांगितले.

मृतांच्या नातेवाइकांना पाच लाखांची मदत जाहीर
सकाळी महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, मुंबई
शहरचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनीही घटनास्थळी भेट दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले. तसेच जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी सूचना दिल्या. मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. दक्षिण मुंबईतील अनेक इमारती धोकादायक असून, त्यांच्या पुनर्विकासातूनच हा प्रश्न सुटू शकतो. सरकार यासाठी प्रयत्नशील आहे, असे सुभाष देसाई म्हणाले.

जखमींवर
जे. जे. आणि सैफीमध्ये उपचार
पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जे. जे. हॉस्पिटलमध्ये एका महिलेसह ९ जणांना दाखल करण्यात आले आहे. बचाव कार्यावेळी अग्निशमन दलाचे पाच आणि एनडीआरएफचा एक असे सहा जवान जखमी झाले असून, दोन जवानांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार जवानांना उपचार करून परत पाठवण्यात आले.

लहान मुले बचावली
इमारत कोसळली
त्या वेळी इमारतीमधील नर्सरी सुरू असती, तर असंख्य लहान मुले बळी पडली असती, अशी भीती येथील स्थानिक रहिवाशांनी वर्तवली.

मृतांची नावे
हसन आरसीवाला (४५), तसलीम आरसीवाला (४५), फातिमा सय्यद जाफर (१४), नसीर अहमद (२४), सय्यद जमाल जाफर (१९), बच्चुआ (२२), नसीर गुलाम शेख (२५), सकीना चश्मावाला (५०), कयुम (२५), रईस (५८), रिझवान (२५), मुस्तफा शहा (२२), नसिरुद्दिन अब्बास चश्मावाला (७१), हाफीज मोहसिन शेख (३८), अल्ताफ हैदर मन्सुरी (१२), अब्बास निजामुद्दिन चश्मावाला (४०), अहमदतुल्ला अब्बास चश्मावाला (३), अफजल आलम (२०), रेश्मा जाफर सय्यद (३८), जाफर सय्यद (४०) अशी मृतांची नावे आहेत.

जखमींची नावे
तसलीम चश्मावाला, फातिमा उमेदवाला, अब्दुल लतीफ, सईद अहमद, सलीम हुसेन, गुलाम बोरा, इक्बाल खान, सैफुद्दिन कुरेशी, अहमद अली, खान कमरूल हसन, अफजल शेख, रुफीया, जुजन हुसन आरसीवाला.


दाऊदची इमारत शेजारीच
हुसैनी इमारतीच्या शेजारीच कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहीम याची इमारत आहे. या इमारतीमध्ये त्याचा भाऊ इक्बाल कासकर राहतो. दुर्घटना घडली तेव्हा तो घरातच होता. मोठा आवाज झाल्याने तो बाहेर आला. या दुर्घटनेमुळे आमच्या इमारतीलाही हादरा बसल्याचे त्याने माध्यमांना सांगितले.

‘मेहता यांनी राजीनामा द्यावा’
राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे ही दुर्घटना घडल्याने नैतिकतेच्या आधारे गृहनिर्माण
मंत्री प्रकाश मेहता यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्टÑवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

Web Title:  Due to the depressed system, 24 victims and 30-year-old men stuck under the 117-year-old six-storey building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.