पावसामुळे विजेच्या मागणीत घट, राज्यात भारनियमन नाही, महावितरणचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 06:11 PM2017-10-09T18:11:35+5:302017-10-09T18:12:22+5:30
मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यात परतीच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे विजेच्या मागणीत घट झाली आहे़ राज्यात सोमवारी कुठेही भारनियमन करण्यात आले नसल्याचा दावा महावितरणच्या प्रशासनाने केला आहे़
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यात परतीच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे विजेच्या मागणीत घट झाली आहे़ राज्यात सोमवारी कुठेही भारनियमन करण्यात आले नसल्याचा दावा महावितरणच्या प्रशासनाने केला आहे़
राज्यात सोमवार ९ आॅक्टोबर रोजी १४ हजार ८०० मेगावॅट एवढी विजेची मागणी होती़ तेवढी वीज महावितरणकडे उपलब्ध असल्याने भारनियमन कुठेही करण्यात आले नाही़ महावितरणच्या प्रशासनाने अल्पकालीन कराराव्दारे १ हजार ४५० मेगावॅट वीज खरेदी केली़ याशिवाय पॉवर एक्सचेंजमधून ६०० मेगावॅट वीज विकत घेण्यात आल्याचे महावितरणने सांगितले़ राज्यातील २ कोटी २० लाख ६६ हजार ३७३ ग्राहकांकडून १७ हजार ९०२ मेगावॅट विजेची मागणी होती़ मात्र राज्याकडे १६ हजार ५५२ मेगावॅट विजेचा पुरवठा होत होता़ दरम्यान, राज्याला १ हजार ३५० मेगावॅट एवढी वीज अपुरी पडत असल्यामुळे मागील दोन दिवसांपासून ए, बी़, सी़, डी, ई, एफ, जी १, जी २ आणि जी ३ असे विभाग तयार करून राज्यात सर्वत्र भारनियमन करण्यात आले होते़
--------
अशी झाली वीज उपलब्ध
महानिर्मिती : ४ हजार ७०० मे़वॅ
अदानी : २ हजार २०० मे़ वॅ
रतन इंडिया : ५०० मे़ वॅ
केंद्रीय प्रकल्प : ३ हजार ९००
जेएसडब्ल्यू : २८० मे़ वॅ
सीजीपीएल : ५६० मे़ वॅ
एम्को : ७५ मे़ वॅ
पवन उर्जेतून : २०० मे़ वॅ
जलविद्युत प्रकल्पातून : १०० मे़ वॅ
---------------
कृषीपंपाचे भारनियमन ८ तासांवर
राज्यातील वीजपुरवठ्यात अडचणी निर्माण होऊ नये व सुसुत्रता साधण्यासाठी कृषी ग्राहकांच्या वाहिनीवरील रात्रीची वीज उपलब्धता ही १७ सप्टेंबर २०१७ पासून १० तासांवरून तात्पुरत्या कालावधीसाठी करण्यात आले आहे़ सध्या राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने चांगले आगमन केल्याने कृषीच्याही वीज मागणीत कमालीची घट झाली आहे़