रसायनांच्या उग्र वासामुळे नेरूळमध्ये खळबळ, गॅसगळतीच्या भीतीने नागरिक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 03:13 AM2017-09-18T03:13:01+5:302017-09-18T03:13:05+5:30
नेरूळ परिसरामध्ये शनिवारी रात्री केमिकलच्या उग्र वासामुळे खळबळ उडाली होती. गॅसगळतीच्या भीतीने सेक्टर ८ व १० मधील शेकडो नागरिक रोडवर जमा झाले होते. अखेर एमआयडीसीतील दूषित पाणी नाल्यात सोडल्याने ही दुर्गंधी पसरल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
नवी मुंबई : नेरूळ परिसरामध्ये शनिवारी रात्री केमिकलच्या उग्र वासामुळे खळबळ उडाली होती. गॅसगळतीच्या भीतीने सेक्टर ८ व १० मधील शेकडो नागरिक रोडवर जमा झाले होते. अखेर एमआयडीसीतील दूषित पाणी नाल्यात सोडल्याने ही दुर्गंधी पसरल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
सेक्टर १० मध्ये गॅसगळतीमुळे वास येवू लागल्याने मध्यरात्री भीतीचे वातावरण पसरले. प्रत्येक सोसायटीमधील नागरिकांनी एकत्र येवून घरोघरी जावून कोठे गॅसगळती झाली आहे का याची पाहणी सुरू केली.
कोणतीही दुर्घटना होवू नये यासाठी नागरिकांनी अग्निशमन दलाला याविषयी माहिती दिली. सेक्टर ८ व १० मध्ये सर्वत्रच वास येत असल्याने तो गॅस गळतीचा नसून एमआयडीसीतील रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडल्याने येत असल्याचे निदर्शनास येताच सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
शनिवार व रविवार महापालिकेला व इतर शासकीय आस्थापनांना सुटी असल्यामुळे काही कारखानदार दूषित पाणी नाल्यात सोडतात. शनिवारीही रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडल्यामुळे हा प्रकार घडला आहे. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते दिलीप घोडेकर यांनी केली आहे.
>नेरूळमध्ये गॅस गळतीप्रमाणे वास येवू लागल्याने खळबळ उडाली होती. परंतु प्रत्यक्षात रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडल्याने हा प्रकार घडला होता. याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे. - दिलीप घोडेकर, माजी विरोधी पक्षनेते