वीज बील थकविल्यामुळे ठाणे जि.प.च्या शिक्षण विभागांचा दिवसभर वीज पुरवठा खंडीत
By सुरेश लोखंडे | Published: December 22, 2017 05:36 PM2017-12-22T17:36:09+5:302017-12-22T17:36:43+5:30
सुमारे ५२ हजार रूपयांचे वीज बील थकविल्यामुळे महावितरण विभागाने माध्यमिक व प्राथमिक दोन्ही विभागांच्या इमारतीसह समाजकल्याण विभागाचा वीज पुरवठा शुक्रवारी खंडीत करण्यात आला
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुमारे ५२ हजार रूपयांचे वीज बील थकविल्यामुळे महावितरण विभागाने माध्यमिक व प्राथमिक दोन्ही विभागांच्या इमारतीसह समाजकल्याण विभागाचा वीज पुरवठा शुक्रवारी खंडीत करण्यात आला. यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना दिवसभर अंधारात कामकाज करावे लागले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीला लागून प्रशासकीय इमारतीमधील प्राथमिक शिक्षण विभाग व मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी सुमारे १९५४ मध्ये उद्घाटन केलेल्या अण्णासाहेब वर्तक सभागृहाच्या या जुन्या इमारतीतील माध्यमिक शिक्षण विभाग व तळमजल्यावरील समाजकल्याण विभाग आज दिवसभर अंधारात चाचपडत होता. सुमारे आॅगस्टपासून ५२ हजार रूपयांचे वीज बील न भरल्यामुळे महावितरण विभागाने ही कारवाई केली . इतर खर्चासाठी मिळणारा निधी नूतन वर्षात मिळणार असल्यामुळे वीज बीलाची रक्कम भरणे शक्य झाले नाही. परंतु बांधकाम विभागाने बील भरण्याचा हवाला दिल्यामुळे शिक्षणाधिकारी मीना यादव यांनीही याकडे लक्ष दिले नसल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय महावितरण विभागाने देखील कोणतीही पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडीत
करण्याची कारवाई केली आहे.
या दोन्ही इमारतींचा विज पुरवठा अचानकपणे खंडीत झाल्यामुळे नेहमीप्रमाणे लोड शेडींग झाल्याचा आंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु दीर्घकाळानंतरही वीज न आल्यामुळे चौकशी केली असता बील थकविल्यामुळे कारवाई झाल्याचे लक्षात आले. महावितरण विभागाकडून कोणतीही अगाऊ सुचना न देता विजपुरवठा खंडीत केल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत होती. यामुळे शिक्षण विभगाच्या दोन्ही इमारतींचे कामकाज ठप्प झाले होते. तर, शिक्षण विभगात कामसाठी आलेल्या नागरीकांची कामे न झाल्यामुळे त्यांना निराश होऊन घरी जावे लागाले.