वृक्षलागवडीमुळे व्याघ्र प्रकल्पांचा सीमावर्ती प्रदेशही होणार हिरवागार
By अोंकार करंबेळकर | Published: September 1, 2017 12:09 PM2017-09-01T12:09:02+5:302017-09-01T12:37:31+5:30
मध्य भारत आणि इतर प्रदेशामध्ये वनांच्या बफर झोनमध्ये 48 हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. यासाठी सामाजिक वने विभाग, वनखाते आणि इतर नर्सरींमध्ये रोपांचे संगोपन करुन निवड करण्यात आली आहे.
मुंबई दि.1- अमर्याद चराई आणि जळाऊ लाकडाच्या तोडीमुळे व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने आणि जंगलांच्या सीमावर्ती प्रदेशात झाडांची मोठी तूट होत असते. या तोडीमुळे जंगलांची आणि पर्यावरणाची न भरून येणारी हानी होत असते. यावर एकमेव उत्तर पुन्हा वृक्षलागवडच असल्याने विदर्भात आणि मध्यप्रदेशामध्ये सातपुडा फाऊंडेशनने बफर झोनमध्ये नव्या रोपांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. गेले दोन पावसाळे ते ग्रामस्थ, ग्रामपंचायतींच्या साथीने हा उपक्रम राबवत आहेत. हा उपक्रम राबवणाऱ्यासाठी नागपूरचे अजय पोतदार, पंचमढीचे अश्रफ आरबी, ताडोबाचे प्रामिक कन्नन, मेळघाटाचे अशोक आठवले, नवेगाव-नागझिराचे मुकुंद धुर्वे आणि कान्हाचे अमित अवस्थी यांची मदत झालेली आहे.
या उपक्रमामध्ये मध्य भारत आणि इतर प्रदेशामध्ये आजवर 48 हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. यासाठी सामाजिक वने विभाग, वनखाते आणि इतर नर्सरींमध्ये रोपांचे संगोपन करुन निवड करण्यात आली आहे. या रोपांमध्ये जांभूळ, आवळा, चिरोंजी, सिताफळ, महू, शिसव, क़ूनिंब, आंबा, बेल, बांबू, करंज या झाडांचा समावेश केला आहे. गेल्या पावसाळ्यामध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये गावकरी आणि शाळांमधील मुलांनी सहभाग घेतला तसेच व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारील गावांमधील ग्रामपंचायती, स्थानिक समुदायांनी मदत केली. सातपुडा व्याघ्र प्रकल्पविभागाच्या बफर प्रदेशामध्ये 15,555, नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळ 7100, कान्हाजवळ 8278, ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पाजवळ 8070, पेंच (म.प्र) जवळ 4375, पेंच (महाराष्ट्र) जवळ 3607 तर मेळघाटाच्या बफर झोनमध्ये 1228 रोपांची लागवड करण्यात आली. या लागवडीबाबत आनंद व्यक्त करताना नवेगाव बांध व्याघ्र प्रकल्पाचे कॉन्झर्वेशन आफिसर मुकुंद धुर्वे म्हणाले, 'गेल्या पावसाळ्यात आम्ही 27,456 रोपांची लागवड केली त्यातील 15,355 रोपे 2017च्या मान्सूनपर्यंत व्यवस्थित रुजली. मृत रोपांच्या जागी आम्ही पुन्हा लागवड केली आणि यावर्षी आणखी रोपे लावण्यात आली. यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत 20757 रोपांची लागवड पूर्ण झालेले आहे.'
रोपांची मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न
गवताची तोड तसेच चराईमुळे आणि जळाऊ लाकडाच्या तोडीमुऴे वनाच्छादित क्षेत्रांजवळ मोठ्या प्रमाणात तोड होत असते. आम्ही लावलेल्या रोपांचे आयुष्य वाढावे तसेच त्यांना गुरांपासून हानी होऊ नये म्हणून नियंत्रित चराईबंदीचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले. ठराविक काळामध्ये ठराविक प्रदेशात चराई होऊ नये अशी त्यामागे अपेक्षित आहे. लावलेली रोपे जगावित म्हणून त्यांना कुंपण घालण्यात तसेच बहुतांश रोपे एखाद्या कुंपणाजवळ, संरक्षक भिंतींजवळ लावण्यात आली त्यामुळे त्यांना एका बाजूने संरक्षण मिळाले. यावर्षी मान्सून येण्यापुर्वी आम्ही गेल्या वर्षी लावलेल्या रोपांचे सर्वेक्षण केले, त्यातून ज्या ठिकाणची रोपे मृत पावली तेथे पुन्हा या वर्षी लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाबरोबर लावलेल्या रोपांची सुरक्षा यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
-किशोर रिठे, सातपुडा फाऊंडेशन