कोकण रेल्वे मार्गावर सावंतवाडीजवळ दुरांतो एक्स्प्रेस रूळावरून घसरली, मोठा अपघात टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 11:04 PM2017-10-26T23:04:11+5:302017-10-26T23:04:54+5:30

कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रेल्वे स्थानकाजवळ नेमळे पाटकरवाडी येथे एर्नाकुलम वरून मुंबईच्या दिशेने जाणा-या दुरांतो एक्सप्रेसचे इंजिन रूळावरून घसरून अपघात झाला. सुदैवाने यात कोणीतीही जीवितहानी झाली नाही.

Durante Express drops near Solapur in Konkan Railway route | कोकण रेल्वे मार्गावर सावंतवाडीजवळ दुरांतो एक्स्प्रेस रूळावरून घसरली, मोठा अपघात टळला

कोकण रेल्वे मार्गावर सावंतवाडीजवळ दुरांतो एक्स्प्रेस रूळावरून घसरली, मोठा अपघात टळला

Next

 सिंधुदुर्ग  - कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रेल्वे स्थानकाजवळ नेमळे पाटकरवाडी येथे एर्नाकुलम वरून मुंबईच्या दिशेने जाणा-या दुरांतो एक्सप्रेसचे इंजिन रूळावरून घसरून अपघात झाला. सुदैवाने यात कोणीतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे रूळाचे काम सुरू असतानाच रूळावर रेल पॅनेल असल्याचा अंदाज मोटरमनला आला नसल्याने अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी निर्दशनास आले आहे. 
अपघातानंतर रेल्वेने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून सावंतवाडी रेल्वे स्थानकातील कनिष्ठ अभियंता आर.टी. मांजरेकर व पर्यवेशक बी. एस. गवस यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान गुरूवारी दुपारी ३ वाजता अपघात घडल्यानंतर तब्बल साडेचार तासांनी दुरोंतोला रूळावर आणण्यात यश आले.  अपघातग्रस्त रेल्वे ही (एर्नाकुलम- लोकमान्य टिळक गाडी क्रमांक १२२२४) अशी आहे.
दुरांतो एक्सप्रेस ही रेल्वे एर्नाकुलमवरून बुधवारी रात्री सुटली होती. ती गुरूवारी दुपारी सावंतवाडीत पोहचली. सावंतवाडी आणि झाराप स्थानकाच्यामध्ये असलेल्या नेमळे-पाटकरवाडी येथे रेल्वेच्या रूळाचे काम सुरू होते. त्यासाठीचे साहित्य रेल्वे रूळावरच होते. यामध्ये रेल्वेच्या रूळाचे पॅनल ही होते. या पॅनलचा अंदाज दुरांतोचे मोटरमन पी. सी. सुधाकर यांच्या लक्षात आला नसल्याने हे पॅनेल थेट इंजिनच्या खाली आले आणि इंजिन रूळावरून खाली घसरले. 
हा अपघात एवढा जबरदस्त होता की  रेल्वेच्या इंजिनचा मोठा आवाज झाला. त्यामुळे नेमळे पाटकरवाडीसह आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ लागलीच रेल्वे रूळावर आले. तर रेल्वे रूळावरून  २०० मीटर घसरत गेली. त्यावेळी  तेथे काम करणारे रेल्वे कर्मचारी, कामगार घाबरून पळून गेले. पण तोपर्यंत रेल्वे रूळावरच थांबली होती. प्रवाशांनी ही आरडाओरड केली.
दुरंतो एक्सप्रेसला अपघात झाल्याची माहिती मोटरमन यांनी प्रथम सावंतवाडी रेल्वे स्थानकांत दिली. त्यानंतर रेल्वेच्या उच्चस्तरीय अधिकाºयांना कळविण्यात आले. नेमळे पाटकरवाडी येथे घसरलेले इंजिन बाजूला करण्यासाठी रेल्वेच्यावतीने तातडीने यंत्रणा मागविण्यात आली. इंजिन रेल्वे रूळावर आणण्यासाठी पेडणे येथून रेस्क्यू इंजिन व व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. ही व्हॅन चार वाजण्याच्या सुमारास आली त्यानंतर वेगात काम सुरू झाले  रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वेचे १०० पेक्षा जास्त कर्मचारी, कामगार घटनास्थळी दाखल झाले होते. 
रूळाचे काम सुरू असल्याने दुरंतो ही प्रतितास दहा ते वीस किलोमीटर वेग होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर रेल्वेची सर्व यंत्रणा कामाला लागली होती. सर्वांच्या प्रयत्नाने अखेर सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास इंजिन बाजूला करण्यात यश मिळवले. त्यानंतर रेल्वेच्या अभियंता विभागाने पुन्हा रेल्वे च्या रूळांची कसून तपासणी केली व रूळ सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र प्रशासन विभागास दिल्यानंतर साडे सात वाजता रेल्वे रूळावरून घसरलेल्या दुरंतो एक्सप्रेसला मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आले 
अपघानंतर कोणते ही संकट उद्भवू नये तसेच प्रवाशांनी सर्तकता बाळगावी यासाठी पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस व पोलिस निरिक्षक सुनिल धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त सावंतवाडी रेल्वे स्थानक व अपघातांच्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. यावेळी कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी खास प्रांताधिकारी सुशांत खांडेकर हे ही दाखल झाले होते. मात्र उशिरापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी स्पष्ट केले.
 
अपघात मानव निर्मितच
दुरंतो एक्सपे्रसचे इंजिन रूळावरून घसरण्याचा हा पहिलाच प्रकार सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसरात घडला आहे. मात्र ज्या ठिकाणी अपघात घडला तेथे रेल्वेच्या रूळांचे काम सुरू होते. असे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. तसेच रूळांवरच नव्या रूळांचे पॅनेल ठेवण्यात आले होते.त्याला हे इंजिन आदळले आणि व इंजिन घसरले. मात्र रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अर्नथ टळला त्यामुळे रेल्वे समोरून येत असताना रेल्वेचे पॅनल रूळावर कसे काय ठेवण्यात आले असा सवाल उपस्थि होत असून हा अपघात मानव निर्मित असल्याचे बोलले जात आहे.

  मोटरमनचे प्रसंगावधान
दुरंतो एक्सपे्रसचा सावंतवाडी रेल्वे स्थानकातून सुटतानाच वेग अत्यंत कमी होता. त्यामुळे मोठा अपघात टळला हे जेवढे सत्य आहे. तेवढेच मोटरमनने रूळाचे काम पाहून रेल्वेचा वेग आणखी कमी केला. पण त्याला रेल्वे रूळावर ठेवण्यात आलेल्या पॅनेलचा अंदाज आला नाही त्यामुळे इंजिन घसरले असले तरी जर रेल्वेचा वेग जास्त असता तर मोठी दुर्घटना घडली असतील पण मोटरमन पी.सी. सुधाकर यांनी प्रसंगावधान दाखवल्याने अनेकांचे प्राण वाचले.
 
साडेचार तासांनी कोकण रेल्वे रूळावर
 कोकण रेल्वेची वाहतूक साडेचार  तास ठप्प होती. रेल्वे कर्मचाºयांनी अथक मेहनत घेऊन सायंकाळी पावणेसात वाजता घसरलेले इंजिन बाजूला करण्यात यश मिळवले. त्यानंतर साडेसात वाजण्याच्या सुमारास दुरंतो मार्गस्थ झाली. या अपघातामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक मात्र पूर्णपणे कोलमडले होते. सहा रेल्वे गाड्या उशिर धावत होत्या. कोकणकन्या, तुतारी एक्सप्रेस व अन्य चार गाड्यांनाही उशिराने सोडण्यात आल्या होत्या.
 
रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे अपघात : प्रवासी
कोकण रेल्वे मार्गावर प्रशासनाच्या कर्मचारी व अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला, असा आरोप रेल्वे प्रवाशी व ग्रामस्थांनी केला. त्याचप्रमाणे जे  रेल्वे रूळाचे काम सुरू होते ते सुरक्षीततेच्या दृष्टीने काळजी घेणे गरजेचे होते. जी डागडूजी चालू होती ती चुकीची होती, असा आरोप रेल्वे प्रवाशांनी केला आहे. कोकण रेल्वे मार्गावर हा चुकीच्या कामाच्या पद्धतीमुळे मोठा अपघात झाला आहे. 

 
कोकण रेल्वे मार्गावर सावंतवाडी-नेमळे याठिकिाणी दुरंतो एक्सप्रेसला जो अपघात झाला तो अपघात रेल्वे ट्रॅकचे काम सुरू असताना झाला.  जे कामगार काम करत होते व रूळाला ही गाडी आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात कोणत्याही रेल्वे प्रवाशाला दुख:पत झाली नाही. मात्र यामुळे रेल्वेची वाहतूक कोलमडली. पण ती वेळेवर सुरू करण्यास रेल्वे प्रशासन सज्ज होते. त्यादृष्टीने नियोजन केले, अशी माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी दिली.
                                          एल. के. वर्मा, कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी

                 अपघाताचा घटनाक्रम

गुरूवारी दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी दुरंतो एक्सप्रेस सावंतवाडी रेल्वेस्थानकात पोहोचली
२ वाजून ४७ मिनिटांनी दुरंतो एक्सप्रेस सावंतवाडीतून रवाना
२ वाजून ५७ मिनिटांनी दुरंतोचे इंजिन नेमळे येथे घसरले
३ वाजून ३० मिनिटांनी पोलिसांसह प्रशासनाचे अधिकारी दाखल
३ वाजून ५२ मिनिटांनी पेडणे येथून रेसक्यू टिमसह यंत्रणा दाखल
६ वाजून ४० मिनिटांनी दुरंतो एक्सप्रेसचे इंजिन रूळावरून हटवण्यात यश
७ वाजून ३० मिनिटांनी दुरंतो पुन्हा मुंबईकडे रवाना

Web Title: Durante Express drops near Solapur in Konkan Railway route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.