एकनाथ खडसेंनी माझ्याबद्दल खालच्या दर्जाची भाषा वापरली, त्यांना तात्काळ अटक करा - अंजली दमानिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 10:06 AM2017-09-06T10:06:01+5:302017-09-06T10:27:14+5:30
भाजपाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना तात्काळ अटक करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
मुंबई, दि. 6 - भाजपाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना तात्काळ अटक करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दमानिया यांनी कारवाईची मागणी केली आहे. एकनाथ खडसे यांनी जळगावच्या मुक्ताईनगरमधील त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आपल्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, खालच्या दर्जाची भाषा वापरली असा आरोप त्यांनी केला आहे.
यासंबंधीचा व्हायरल झालेला एक व्हिडीओही त्यांनी पुरावा म्हणून दिला आहे. मंगळवारी दमानिया यांनी जळगाव पोलीस स्थानकात खडसेंविरोधात रीतसर तक्रार दाखल केली व कलम 354 अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली.
अंजली दमानिया यांनीच एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांची वेगवेगळी प्रकरणे समोर आणली. त्यामुळे खडसे यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला व त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
खडसेंना सोडणार नाही - अंजली दमानिया
एकनाथ खडसेंनी माझ्याबद्दल जी भाषा वापरली त्यामुळे मी प्रचंड व्यथित झाले आहे. खडसेंविरोधात मी तिस-यांदा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत आहे. यावेळी त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर, मी थेट कोर्टात जाईन असे दमानिया यांनी म्हटले आहे. आज मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्याशीही चर्चा करणार आहे. यावेळी खडसेंना आपण सोडणार नाही असे दमानिया यांनी म्हटले आहे.
खडसे यांचा राजीनामा
मागच्यावर्षी एकनाथ खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आपल्यावरील सर्व आरोप निराधार असून, निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत मी मंत्रिपदापासून दूर होत आहे, असे खडसे यांनी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी लागलीच खडसे यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचे सांगत त्यांच्यावरील सर्व आरोपांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाईल, असे टि्वटरवरुन जाहीर केले होते.
राजीनाम्याची ७ कारणे...
- खडसेंचा निकटवर्तीय गजानन पाटील याला ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी झालेली अटक.
- भोसरी; पुणे येथील एमआयडीसीचा कोट्यवधी रुपये किमतीचा भूखंड पत्नीच्या नावे खरेदी केला. व्हीसल ब्लोअर हेमंत गवंडे यांनी पुराव्यासह केलेला आरोप आणि पोलिसात दाखल केलेली तक्रार
- अंजली दमानिया यांनी कुऱ्हा-बडोदा उपसा सिंचन योजनेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी आज़ाद मैदानावर आरंभिलेले उपोषण
- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या घरातून खडसेंच्या मोबाइलवर झालेले कथित कॉल्सचे प्रकरण हॅकर मनिष भंगाळे याने बाहेर काढले.
- खडसे यांच्या कार्यालयातील
वादग्रस्त अधिकारी वर्ग
- मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी अधूनमधून उडणारे खटके
- पत्नीला महानंदचे संचालकपद, मुलीकडे जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्षपद आणि सूनबाई खासदार. पक्षश्रेष्ठींना ही घराणेशाही खटकली.
काय आहे कलम 354
स्त्रीच्या मान, सन्मानाचा भंग केल्यास कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल होतो.