निवडणुका कधीही होऊ शकतात, शिवसैनिकांनो तयार राहा, उद्धव ठाकरेंकडून मध्यावधीचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 05:47 PM2017-11-01T17:47:06+5:302017-11-01T17:47:40+5:30
मुंबई : निवडणुका कधीही होऊ शकतात, शिवसैनिकांनो तयार राहा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांना दिले आहेत.
मुंबई : निवडणुका कधीही होऊ शकतात, शिवसैनिकांनो तयार राहा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांना दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी अचानकपणे मध्यावधीचे संकेत दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नारायण राणे यांचा राज्य मंत्रिमंडळातला प्रवेश जवळपास निश्चित झालाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील या दोघांनीही नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे संकेत दिलेत. नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातल्या संभाव्य प्रवेशावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेचा विरोध हा निरर्थक असल्याची प्रतिक्रिया दिली होती. ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही मध्यावधीचे संकेत दिले आहेत. त्याप्रमाणेच नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची संभाव्य तारीख चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर करून टाकल्यानं शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
भाजपातले दिग्गज नेते अशी ओळख असलेल्या खडसेंपेक्षा काँग्रेसमधून बाहेर पडलेले नारायण राणे भाजपाला जवळचे झाले का ? असा प्रश्न भाजपाच्या गोटातून विचारला जातोय.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत नारायण राणेंनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याची घोषणा केली होती. मात्र राणेंचा राज्य मंत्रिमंडळातील प्रवेश अद्याप अडलेला आहे. राणेंच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह बैठका झाल्या आहेत. मात्र त्यांच्या मंत्रिपदाविषयी अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. राणेंच्या एनडीए प्रवेशामुळे नाराज असलेल्या शिवसेनेने आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपले सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकरवी आपला निरोप मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवला आहे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाला अनुकूलता दर्शवली होती.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हातील नारायण राणेंचे विरोधक आणि गृह, अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे संकेत दिले असले, तरी आठ दिवस थांबा. ईश्वरी संकेत वेगळे आहेत, अशी भविष्यवाणी केली होती. आठ दिवसांत मोठ्या घडामोडी घडतील, अशी पुस्तीही त्यांनी याला जोडली. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत, नारायण राणे, प्रकाश परब आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी येणार आहे. अनेक कामे प्रस्तावित केली आहेत. बांधकाम विभागाच्या रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. तेथे खड्डे भरण्यासाठी कोणताही ठेकेदार पुढे येत नाही. त्यामुळे आता बांधकाम विभाग स्वत:च हे खड्डे भरेल, असे मंत्री केसरकर यांनी जाहीर केले. याबाबतचे आदेश सावंतवाडी बांधकाम विभागाला दिले आहेत. तर कणकवली बांधकाम विभागाने प्रस्ताव पाठविला तर त्यांनाही असे आदेश दिले जातील," असेही त्यांनी सांगितले.