महापारेषण कंपनीत विद्युत रोहित्र घोटाळा
By Admin | Published: May 9, 2017 02:07 AM2017-05-09T02:07:45+5:302017-05-09T02:07:45+5:30
महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनीतील पाच हजार ६६८ कोटींच्या वादग्रस्त कंत्राटांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी सुरू असतानाच,
राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनीतील पाच हजार ६६८ कोटींच्या वादग्रस्त कंत्राटांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी सुरू असतानाच, आता या कंपनीतील अतिउच्चदाब विद्युत रोहित्र क्षमता बदल व दुरुस्तीआड झालेला घोटाळाही उघडकीस आला आहे. शासनाच्याच तांत्रिक आॅडिटर्सनी या घोटाळ्याचे बिंग फोडले आहे.
ईपीसी कंत्राटांतर्गत काही वर्षांपूर्वी राज्यात २६५ रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बदलविले गेले. जुन्या रोहित्रांपैकी काही कोट्यवधी रुपयांत भंगारात विकले गेले, तर काही अद्यापही पडून आहेत.
यातील काही रोहित्र हे नव्या रोहित्राच्या क्षमता बदलासाठी वापरले गेले, परंतु या क्षमता बदलातच खरा घोटाळा झाला. नवे विद्युत रोहित्र सुमारे अडीच कोटी रुपयांचे मिळत असताना, तेवढीच रक्कम जुन्या प्रत्येक रोहित्रांच्या क्षमता बदलावर खर्ची केली गेली. २०१२ ते २०१६ या काळात घडलेला हा प्रकार २०१६-२०१७च्या तांत्रिक लेखा परीक्षणात उघडकीस आला.
औरंगाबाद येथील जैन इलेक्ट्रिकल्स व सेट आॅन-साइड इलेक्ट्रिकल्स प्रा.लि., पुणे येथील महर्षी इलेक्ट्रिकल्स आणि ठाणे येथील आदित्य इलेक्ट्रिकल्स या कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आले.
राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कराड, नागपूर, नाशिक, पुणे, वाशी या परिमंडळांतर्गत अधीक्षक अभियंत्यांनी (अतिउच्चदाब संचालन व सुव्यवस्था प्रविभाग) आपल्या अधिकारात प्रत्येकी चार ते पाच विद्युत रोहित्रांची क्षमता बदलाची कामे करून घेतली.
जुने रोहित्र, कोअर आणि वाइडिंग, आॅइल आदी पारेषणचेच वापरले गेले असतानाही, जुन्या सुमारे ५० रोहित्रांवर प्रत्येकी तब्बल अडीच कोटींचा खर्च दाखविला गेला. त्यावर तांत्रिक आॅडिटर्सने गंभीर स्वरूपाचे लेखा आक्षेप नोंदविले आहेत.