लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करणार प्रबोधन
By Admin | Published: August 27, 2016 12:55 AM2016-08-27T00:55:40+5:302016-08-27T00:55:40+5:30
लाचखोरीला लगाम घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून येत्या गणेशोत्सवामध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
पुणे : लाचखोरीला लगाम घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून येत्या गणेशोत्सवामध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे. एसीबीच्या ‘स्टँडी’द्वारे शहरातील महत्त्वाच्या गणेश मंडळांसमोर अधिकारी आणि कर्मचारी लोकांचे प्रबोधन करणार आहेत. शक्य झाल्यास यामध्ये मंडळांचीही मदत घेतली जाणार असल्याची माहिती अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.
काही महिन्यांपासून एसीबीच्या पुणे विभागाने जनजागृतीवरही अधिक भर दिला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध नागरिकांनी तक्रारी द्याव्यात, याकरिता एसीबी थेट नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. एसीबीने प्रभात फेरीची ठिकाणे, गर्दीची ठिकाणे यासोबतच बाजार पेठा, मॉल्स, सिनेमागृहे, बागा अशा ठिकाणी ‘स्टँडी’ हा उपक्रम राबवून जनजागृती केली आहे.
एसीबीचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उभे राहून लोकांना लाचखोरीचे तोटे समजावून सांगतानाच त्यांना पुढे येऊन लाचखोरांविरुद्ध तक्रारी देण्याचे आवाहन करतात. आता हाच उपक्रम गणोशोत्सवामध्ये राबविण्यात येईल.
शासकीय कामांसाठी द्याव्या लागणाऱ्या लाचेमुळे अनेकदा लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. चिरीमिरीसाठी लोकांची कामे अडवून ठेवली जातात. अनेकदा इच्छा नसतानाही लाच देण्याशिवाय गत्यंतर राहत नाही.
अशा वेळी एसीबीकडे तक्रारी दिल्यास तक्रारदारांना न्याय देता येईल. म्हणून एसीबीचे काम, नेमकी लाच कशी असते, ती कोणकोणत्या कामांसाठी मागितली जाते, त्याचा काय परिणाम होतो याची माहिती लोकांना देण्यात येईल. पोलिसांनी या उपक्रमासाठी शहरातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांची यादी तयार केली आहे.
>काही निवडक मंडळांसमोर एसीबी ही जनजागृती करणार आहे. महत्त्वाच्या मंडळांच्या परिसरात विभागाचे खास स्टॉल लावून तेथून जनजागृती व पत्रके वाटली जाणार आहेत. एसीबीचे दूरध्वनी क्रमांक, व्हॉट्सअॅप क्रमांक, ई-मेल, वेबसाईट यांचीही माहिती दिली जाणार असल्याचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले.