EVM हॅकिंग: सय्यद शुजाच्या दाव्यांबाबत पंकजा मुंडेनी सोडले मौन, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 03:37 PM2019-01-23T15:37:16+5:302019-01-23T15:37:47+5:30
अमेरिकन हॅकर सय्यद शुजाने केलेल्या दाव्याला दोन दिवस उलटल्यानंतर मुंडेंची ज्येष्ठ कन्या आणि राज्य सरकारमधील मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मौन सोडले आहे.
मुंबई - भाजपाचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या EVM हॅकिंगबाबत माहिती असल्याने झाल्याचा दावा अमेरिकन हॅकर सय्यद शुजा याने केल्याने भारतीय राजकारणात खळबळ उडाली होती. दरम्यान, शुजाने केलेल्या दाव्याला दोन दिवस उलटल्यानंतर मुंडेंची ज्येष्ठ कन्या आणि राज्य सरकारमधील मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मौन सोडले आहे. "मी हॅकर नाही, गोपीनाथ मुंडेंची मुलगी आहे. मला मुंडेंच्या मृत्यूचे राजकारण करायचे नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी सय्यद शुजा याने केलेल्या खळबळजनक दाव्यांबाबत प्रथमच मौन सोडले. ''मी हॅकर नाही, गोपीनाथ मुंडेंची मुलगी आहे. मला मुंडेंच्या मृत्यूचे राजकारण करायचे नाही. गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाल्यानंतर मी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. दरम्यान ही मागणी पूर्ण झाली आहे, तसेच त्यातून माझे समाधानही झाले आहे. आता याबाबत अधिक चौकशी करायची असेल तर देशातील मोठे नेते निर्णय घेतील.''असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. तसेच EVM हॅक होऊ शकत नाही हे निवडणूक आयोगाने वारंवार स्पष्ट केले आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.
2014 साली भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये EVM हॅकिंग झाले होते. तसेच या EVM हॅकिंगबाबत कल्पना असल्यानेच भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली, असा दावा अमेरिकन हॅकर सय्यद शुजा याने केला होता. या खळबळजनक दाव्यामुळे देशातलं राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणाची चौकशी रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली होती. मात्र पंकजा मुंडे यांनी आतापर्यंत या प्रकरणी मौन पाळले आहे.